। लोणावळा । प्रतिनिधी ।
जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत मोटार अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. अपघातात मोटारीतील एक जण गंभीर जखमी झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले दोघेजण ठाणे शहरातील आहेत.
राजेंद्रकुमार देवेंद्रकुमार जैन (वय 44, रा. कळवा, ठाणे), अवतार गुरूदयालसिंग सेहेरा (वय 50, रा. कोपरी, ठाणे) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात नितेशकुमार देवेंद्रकुमार जैन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी पहाटे मुंबईहून पुण्याकडे अवजड कंटेनर येत होता. कंटेनरमध्ये लाकडे होती. कामशेत खिंडीत तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि मार्गिका सोडून मुंबईकडे जात असलेल्या मोटारीवर कंटेनर आदळला. मोटारीत अडकलेल्या नितेशकुमार जैन याला मोटारीतून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने कामशेतमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर कंटेनर उलटला. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला काढला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.