कर्मचार्‍यांची सांख्यिकी माहिती सादर करा

। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणार्‍या सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणार्‍या सर्व कर्मचार्‍यांची पुरुष, स्त्री व एकूण सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस, विषयांकित कायद्यातील तरतूदींनुसार विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.

त्यानुसार जून, 2022 अखेर संपणार्‍या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड- अलिबाग या कार्यालयाकडून सुरु असून, या सर्व आस्थापनांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. यासाठी सर्व आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आपल्याकडील अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.

हे तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2022 आहे, याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी व हे तिमाही विवरणपत्र विहित मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे. याबाबत माहिती आवश्यक असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक- 02141-222029 व ई-मेल आयडी alibagrojgargmail.com यावर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक (युजरआयडी) व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन , जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अ.मु.पवार यांनी केले आहे.

Exit mobile version