| आगरदांडा | प्रतिनिधी |
काशीद येथील समुद्रकिनारी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सानेगुरुजी विद्यलयातील माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना काशीद येथील समुद्रात जीव गमवावा लागला आहे. ही अत्यंत दुःखदायी घटना असून, राज्य शासनाने या गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीमधून आर्थिक मदत करावी, अशी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे. अपघातामध्ये अथवा आग लागून मृत्यू झालेल्यांना राज्य शासन तात्काळ आर्थिक मदत देते, मग या मुलांच्या कुटुंबालासुद्धा मदत द्यावी, असेही पाटील म्हणाले.
यावेळी त्यांच्यासमवेत शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा सहचिटणीस मनोज भगत, मुरुड तालुका चिटणीस अजित कासार, नवनिर्वाचित सुपारी संघाचे संचालक प्रवीण चौलकर, विकास दिवेकर, नरेश पाटील, जयंत कासार, संदीप गोणभरे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार पंडित पाटील हे एका कार्यक्रमासाठी मुरुड येथे आले असता पत्रकरांशी आपले विचार व्यक्त करताना बोलत होते.
पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू होत असल्याने काशीदचे नाव बदनाम होत आहे. राज्य सरकारचे पर्यटन विभाग याबाबत कोणतीही उपाययोजना करीत नाही. जगामध्ये एवढे समुद्रकिनारे आहेत, परंतु काशीदसारख्या वारंवार घटना घडत नाही, कारण तेथील लोकांनी यावर ठोस उपायोजना केल्या आहेत. परंतु, महाराष्ट्रातील नामवंत अशा काशीद ठिकाणी राज्य शासनाने उपाययोजना करून ग्रामपंचायत अथवा तत्सम यंत्रणेस सहकार्य करणे खूप आवश्यक आहे. काशीदबाबत एक विशेष तज्ज्ञ लोकांचा अभ्यास गट स्थापन करून यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले आहे. भविष्यात एकही प्राण जाणार नाही यासाठी प्रयत्न होणे खूप गरजेचे आहे. काशीद येथे वॉच टॉवर तसेच तत्सम सुविधा देणे खूप गरजेचे असल्याचे मत पंडित पाटील यांनी व्यक्त केले आहे.