| पुणे | वृत्तसंस्था |
जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत मतदानाचे प्रमाण वाढावे आणि सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, तसेच त्याची माहिती मतदारांना देण्यात यावी, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
निवडणूकविषयक आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, निवडणूक निरीक्षक आनंधी पालानीस्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, निवडणूक खर्च निरीक्षक विजय कुमार, निवडणूक पोलिस निरीक्षक जॉएस लाल्लरेमावी आदी उपस्थित होते. ते म्हणाले, एकापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मतदार मदत कक्ष ठेवण्यात यावा. मतदारांना रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी शक्य असल्यास शहरी भागात प्रतीक्षा कक्षाची सुविधा करावी. मतदानाच्या दिवशी कामगारांना मतदानासाठी पगारी रजा देण्याच्या सूचना उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींना द्याव्यात.
निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यावर विशेष लक्ष ठेवावे. कुठेही अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाययोजना करा. मतदानांसंबंधी सर्व अहवाल वेळेत सादर करावेत. वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवावे. सी-व्हिजिलवर प्राप्त तक्रारींचे 100 मिनिटांत निराकारण करावे. मतदानाच्या वेळी येणार्या अडचणी टाळण्यासाठी मतदान केंद्र पथकाला मतदान आणि ईव्हीएमविषयक सूक्ष्म बाबींचे प्रशिक्षण द्यावे. पोलिस विभागाने केलेल्या तयारीची माहिती या वेळी देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. बैठकीनंतर मुख्य निवडणूक अधिकार्यांनी भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामाला भेट देऊन मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली.