| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील 71 ग्रामपंचायत हद्दीमध्ये कचर्याचा प्रश्न जटिल होत चाललेला आहे. कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राऊंड नसल्याने रस्त्याच्या बाजूला किंवा इतर ठिकाणी कचरा टाकला जातो. डम्पिंग ग्राऊंड नसल्याने ही परिस्थिती गावांवर ओढवली आहे. 71 ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायतींनी सिडको, वनविभाग, पंचायत समिती, एमआयडीसी, जिल्हाधिकारी यांच्याकडे डम्पिंग ग्राऊंडसाठी जागेची मागणी केली आहे.
पनवेल तालुक्यातील चिखले, गव्हाण, कराडे खुर्द, न्हावे, नेरे, पळस्पे, पारगाव, शिरढोण, तरघर, विचुंबे या दहा ग्रामपंचायतींनी डम्पिंग ग्राउंडसाठी जागेची मागणी केली आहे. पनवेल तालुक्यातील कचर्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. कचरा मोकळ्या जागेत, नदीत किंवा खड्ड्यामध्ये फेकला जातो. लोकवस्ती भरमसाट वाढत असल्याने कचरा देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे. ओला, सुका कचरा, जैविक कचरा एकत्रच टाकला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरनीवर आला आहे. डम्पिंग ग्राउंड नसल्याने जागोजागी कचरा टाकलेला दिसून येत आहे. जवळपास सगळ्याच गावांमध्ये ही परिस्थिती सारखीच असल्याचे दिसून येत आहे. दर पाच वर्षांनी निवडणूक होते. सरपंच बदलतात. बहुतांशी सदस्य नवीन-जुने तेच असतात. मात्र, कचर्याची समस्या जैसे थेच दिसते. काही वेळेला हा कचरा जाळून टाकला जातो. त्यामुळे प्रदूषणात वाढ होते. ओला आणि सुका कचरा दोन्ही एकत्र टाकत असल्यामुळे कचरा कुजून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जाते.