अलिबागच्या प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी 406 कोटींची तरतूद

पालकमंत्री अदिती तटकरे यांची माहिती
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगडच्या अलिबाग येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य सरकारने 406 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणार्‍या बहुतांश सुविधांची पूर्तता राज्य सरकारने केली आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर लवकरच या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळेल, असा विश्‍वास रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला. त्या अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

2010 मध्ये राज्यसरकारने रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास मंजुरी दिली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे हा वैद्यकीय महाविद्यालय सुरु होऊ शकले नव्हते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा अलिबाग येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु व्हावे यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. अलिबाग तालुक्यातील उसर येथील 53 एकर जमीन प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी हस्तांतरीत करण्यात आली आहे. यासाठी उद्योग विभागाने एमआयडीसीच्या ताब्यातील 23 एकर जागा उपलब्ध दिली आहे. आता या जागेवर 100 विद्यार्थी क्षमता असलेले महाविद्यालय, 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालय आणि प्रशासकीय इमारत, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची उभारणी केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने 406 कोटी रुपयांची तरतूद केली असून, तसे आदेशही काढण्यात आल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

आरसीएफ कॉलनी, कुरुळ येथील सहा इमारती आणि शाळेची जुनी वास्तू तीन वर्षांसाठी वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरसीएफ कंपनीमार्फत मोफत उपलब्ध करून दिली आहे. या इमरतींच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयात 15 कोटी रुपये खर्चून लेक्चर हॉल, प्रशासकीय इमारत आणि प्रयोगशाळा इमारत बांधली जात आहे. या इमारतीचे बांधकाम सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. महाविद्यालयासाठी 40 पदे भरण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अलिबाग येथे तातडीने वैद्यकीय महाविद्यालय सुरु करता यावे यासाठी आवश्यक बहुतांश गोष्टींची पूर्तता राज्य सरकारने केली आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर अलिबाग येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु होऊ शकेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उसर येथे वैद्यकीय महविद्यालयाचे बांधकाम करूनही बरीच जागा शिल्लक राहणार आहे. या ठिकाणी आयुर्वेद महाविद्यालय सुरु करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उसर येथील महाविद्यालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या इमारती जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी वापरल्या जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version