पृथ्वी, सूर्यकुमारचा इंग्लंडचा मार्ग मोकळा

विलगीकरणा पूर्ण होताच संघात सामील
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात सामील होण्यासाठी फलंदाज सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ पूर्णपणे फिट झाले आहेत. त्यामुळे त्यांचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोघेही श्रीलंका दौर्‍यावर असताना त्याठिकाणी संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोघांच्या इंग्लंडला जाण्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत होते.

दरम्यान, आता दोन्ही खेळाडूंच्या तीन कोव्हिड-19 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे पुढील 24 तासांत दोघेही इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. भारतीय संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने शॉ आणि यादवला इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे.

श्रीलंका दौर्‍यावर गेले असताना सामन्यानंतर त्वरितच पृथ्वी आणि सूर्यकुमार हे इंग्लंडला रवाना होणार होते. पण, श्रीलंकाविरुद्धच्या दुसर्‍या टी-20 सामन्याआधी भारताचा ऑलराऊंडर कृणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळला. ज्यामुळे इतर खेळाडूंचीही कोरोना चाचणी करण्यात आली. तर, पृथ्वी आणि सूर्यासह आणखी काही खेळाडू कृणालच्या निकट संपर्कात आल्याने त्यांची अधिक काळजी घेण्यात आली होती. पण, सूर्या आणि पृथ्वी दोघांनाही कोरोनाची कोणतीच लक्षणं नसल्याने ते इंग्लंडला रवाना होणार आहेत.

Exit mobile version