। मुंबई । वृत्तसंस्था ।
बीसीसीआयने रणजी ट्रॉफीचा यावर्षीचा हंगाम दोन टप्प्यांमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला टप्पा 17 फेब्रुवारी सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केरळ संघाची घोषणा केली गेली आहे. मागच्या मोठ्या काळापासून ज्याच्यावर क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घातली गेली होती, तो एस श्रीसंत आता रणजी ट्रॉफीत पुनरागम करणार आहे. केरळच्या रणजी संघात एस श्रीसंतलाही सामील केले गेले आहे.
17 फेब्रुवारीपासून सुरू होणार्या या स्पर्धेसाठी श्रीसंतला केरळच्या संघात स्थान मिळाले आहे. केरळ संघाला त्यांचा पहिला सामना हरियाणा संघाविरुद्ध खेळायचा आहे. केरळ संघ ग्रुप बी मध्ये सामील आहे. ज्यामध्ये त्यांच्यासमोर बंगाल, विदर्भ, राजस्थान, हरियाणा आणि त्रिपुरा या संघांचे आव्हान असणार आहे. हे सर्व सामने बेंगलोरमध्ये पार पडतील. पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे आयोजन मुंबई, बेंगलोर, कोलकाता, अहमदाबाद, त्रिवेंद्रम आणि चेन्नई या शहरांमध्ये केले जाईल.
श्रीसंत 2013 आयपीएलदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकारणात दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर क्रिकेट खेळण्याची बंदी घातली गेली. मागच्या मोठ्या काळापासून तो कोर्टात लढा देत होता. अखेर 2020 मध्ये त्याची या आरोपांमधून निर्दोष सुटका केली गेली. आता चाहतेही त्याला तब्बल 9 वर्षांपेक्षा अधिक काळानंतर पुन्हा एकदा लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पाहण्यासाठी इच्छुक आहेत. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात शॉर्टलिस्ट केल्या गेलेल्या 590 खेळाडूंमध्येही एस श्रीसंतचे नाव आहे. अशात मेगा लिलावात त्याने स्वतःची बेस प्राइस 50 लाख रूपये ठेवली आहे. त्याच्यावर फ्रेंचायझींकडून बोली लागण्याची पूर्ण शक्यता आहे.