तज्ज्ञांच्या रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा कोलमडली
|माणगाव / प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांसह दक्षिण रायगड आणि शेजारील रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले माणगाव उपजिल्हा रुग्णालय तज्ज्ञ डॉक्टरांच्या तीव्र कमतरतेमुळे अडचणीत सापडले आहे. शासनाने 100 बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारले असले, तरी उपचारासाठी आवश्यक असलेले तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
रुग्णालयासाठी 15 कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टरांची पदे मंजूर असतानाही वैद्यकीय अधीक्षक, जनरल सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ आणि दंततज्ज्ञ यांसारखी महत्त्वाची पदे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रिक्त आहेत. परिणामी गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करणे कठीण होत आहे.
नेत्रतज्ज्ञाची नियुक्ती असूनही त्यांची प्रतिनियुक्ती महाड उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आल्याने माणगावच्या रुग्णांना त्या सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. वैद्यकीय अधीक्षकाचे पदही रिक्त असून प्रभारी स्वरूपात कारभार सुरू आहे. अपघात विभागातील चार सीएमओ पदेही केवळ 11 महिन्यांच्या करारावर भरली गेली आहेत.
रुग्णालयात सिटीस्कॅन, डायलेसिस, ऑक्सिजनसह आधुनिक सुविधा उपलब्ध असल्या, तरी तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे त्या सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. ऑन-कॉल आणि अर्धवेळ डॉक्टरांची व्यवस्था असली तरी गरजेच्या वेळी ते वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीही सातत्याने पुढे येत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाढते अपघात, दक्षिण रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता माणगाव उपजिल्हा रुग्णालयाला सक्षम करणे आवश्यक आहे. मात्र वर्षानुवर्षे रिक्त पदे न भरल्याने आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रुग्णालयात जनरल सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन, भूलतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांची तातडीने कायमस्वरूपी नियुक्ती करून सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.







