|पनवेल |प्रतिनिधी |
खारघर पोलिसांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या मोहम्मद अथर हुसॅन शमशाद हुसॅन अंसारी (28) आणि अलत्मीम अवैश सिद्दीकी (20) या सराईत तस्करांना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींकडून तब्बल 14.11 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) तसेच मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि रोकड असा एकूण 4.33 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खारघर पोलिसांचे पथक सेक्टर-35 एफ भागात गस्त घालत असताना साई सिम्फनी सोसायटीसमोर मोहम्मद हुसॅन आणि अलत्मीम सिद्दीकी संशयास्पदरित्या आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, हुसॅन अन्सारी याच्याजवळ 70 हजार किंमतीचे 14.11 ग्रॅम एमडी पावडर, मोबाईल फोन, मोटारसायकल व रोकड सापडली. तर अलत्मीम अवैश सिद्दीकी याच्याजवळ 44 हजार रुपये किंमतीचे मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि नोटा मोजण्याचे मशिन सापडले. त्यांनंतर पोलिसांनी अलत्मीम अवैश सिद्दीकी याच्या साई सिम्फनी इमारतीतील 2108 या फ्लॅटची झडती घेतली असता, तेथे एमडी आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली.







