|पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूरनजीकच्या कशेडी घाटामध्ये मंगळवारी रात्री खेडकडे जाणाऱ्या भरधाव यामाहा मोटर सायकलची घाट रस्त्यालगतच्या रेलिंगला जोरदार धडक बसली. अपघातामध्ये मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला.
महाड तालुक्यातील वाळण झोळीचा कोंड येथील रहिवाशी तरुण राज विनोद मोरे (वय 23 वर्ष) हा त्याच्या ताब्यातील यामाहा कंपनीची आर15 मोटर सायकल (क्रमांक एम एच06 सीएस 2594) घेऊन मंगळवार दि. 4 जुलै रोजी रात्री महाड कडून खेडच्या दिशेने जात असताना कशेडी घाटातील चोळई गावच्या हद्दीत सायली हॉटेल समोर आल्यानंतर रस्त्याच्या वळणावर रस्त्याच्या धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटर सायकल भरधाव वेगाने चालवून रस्त्यालगतच्या रेलिंगला ठोकर दिली. या अपघातामध्ये मोटार सायकलस्वार तरूण गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी ॲम्ब्युलन्सने ग्रामीण रुग्णालय महाड येथे दाखल केले. यावेळी राज विनोद मोरे या मोटारसायकलस्वाराला डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
महामार्गावरील अपघात ग्रस्त वाहन बाजुला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पोलादपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.







