। बार्सिलोना । वृत्तसंस्था ।
कायलियन एम्बापेने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर पीएसजीने बार्सिलोनाचा 4-1 असा पराभव केला आणि पहिल्या टप्प्यातील पिछाडी मागे टाकून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
पॅरिसमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील लढतील पीएसजीला 2-3 अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. आता बार्सिलोनात झालेल्या दुसर्या टप्प्यात त्यांनी 4-1 असा विजय मिळवला आणि 2021 नंतर प्रथमच चॅम्पियन्स लीगमध्ये उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात पीएसजीचा सामना बोर्सिया ड्रॉटमंड संघाविरुद्ध होईल. ड्रॉटमंड संघाने अॅटलेटिको माद्रिदवर 5-4 (सरासरी) अशी मात केली.
बार्सिलोनाविरुद्धच्या या सामन्यात पीएसजीने आक्रमक सुरुवात करून वर्चस्व मिळवले होते; परंतु पहिला गोल करण्याचा मान बार्सिलोनाला मिळाला. लामिने यामल याने उजव्या बगलेतून आक्रमण केले आणि नुनो मेंडेसकडे चेंडू दिला. त्यानंतर त्याने दिलेल्या पासवर राफिन्हाने शानदार गोल केला. 12 व्या मिनिटालाच हा गोल स्वीकारल्यामुळे पीएसजीसमोरचे आव्हान वाढले होते. कारण सरासरीत बरोबरी साधण्यासाठी त्यांना दोन गोलांची गरज होती. तसेच, हा सामना बार्सिलोनाच्या होम ग्राऊंडवर होत असल्यामुळे प्रेक्षक बार्सिलोनाच्या बाजूने होते.
अशा अटीतटीच्या क्षणी बार्सिलोनाचा डिफेंडर रोनाल्ड अरायो रेड कार्ड मिळाले. त्यामुळे बार्सिलोनावर पुढील 60 मिनिटांच्या खेळात 10 खेळाडूंसह खेळण्याची वेळ आली. या संधीचा फायदा ऑसमाने देम्बेले याने घेतला आणि सहा यार्डावरून चेंडू गोलजाळ्यात मारला. त्यानंतर हाकिमीच्या पासवर वितिन्हा याने गोल केला. पीएसजीने 2-1 अशी आघाडी घेतली. त्यापेक्षा सरासरीत 4-4 अशी बरोबरी साधली.
या गोलामुळे आत्मविश्वास वाढलेल्या आणि उपांत्य फेरी गाठण्याची संधी निर्माण झालेल्या पीएसजीच्या खेळाची धार अधिकच वाढली. एम्बापेने सूत्रे घेतली आणि 61 व्या मिनिटाला मैदाना गोल केल्यावर 89 व्या मिनिटाला पेनल्टी कीक सत्कारणी लावली.