| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील मानसिक रुग्णालयामधील मनोरुग्ण एकमेकांवर हल्ला करत असून गेल्या साडेतीन वर्षांत चार मानसिक रुग्णालयांमध्ये 395 घटना घडल्या आहेत. मारामारीत रुग्ण जखमी होतात. कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर रुग्ण चिडचिड करतात आणि हिंसक बनतात. पुण्याच्या रुग्णालयात सर्वाधिक घटना घडल्या आहेत. तर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर तर ठाण्याचे तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुण्यातील मानसिक रूग्णालयात 166 हिंसक घटना घडल्या असून, त्यात 116 रूग्ण जखमी झाले आहेत. ठाण्यातील मनोरुग्णालयात रुग्णांमध्ये मारामारीच्या 103 घटना घडल्या आहेत. या प्रकरणांमध्ये 103 रुग्ण जखमी झाले आहेत. नागपूरच्या मनोरुग्णालयात मनोरुग्णांमध्ये 126 हिंसक घटना घडल्या आहेत.
मनोरुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरही हल्ला करतात. ठाणे रूग्णालयात 10 कर्मचार्यावर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. येथील एका कर्मचाऱ्याने मनोरुग्णावरही हल्ला केला असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या माहितीतून मिळाली आहे. ठाण्याच्या मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मलिक म्हणाले की, रुग्ण हिंसक होण्यामागे अनेक कारणे आहेत. एक तर त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. कुटुंब सोडून दिल्याने अनेक रुग्ण नैराश्यग्रस्त होतात. अशा रुग्णांची औषधे बदलली जातात. काही रुग्णांना स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले आहे. जर रूग्ण हिंसक वर्तन करत असतील तर त्यांना योग्यरित्या नियंत्रित केले पाहिजे. यासाठी विशेष रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना प्रशिक्षण दिले जाते.