पोलादपूरमध्ये पीटीपीएल ट्रॉफीचे अनावरण

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील क्रिकेटपटूंना एकत्रितपणे संघभावनेतून खेळविण्यासाठी स्थापन झालेल्या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनतर्फे गेल्यावर्षी पोलादपूर तालुका प्रिमियम लिगचा पहिला सीझन यशस्वी झाल्यानंतर दुसर्‍या सीझनसाठी तालुक्यातील खेळाडू सज्ज झाले आहेत. याअनुषंगाने पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील छ.शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळयासमोर महाराजांची महाआरती करून लोहारे येथे हॉटेल बालाजीच्या शामियान्यामध्ये पीटीपीएल पार्ट-टू चे ऑक्शन झाले. यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यमुद्रेतील ट्रॉफीचे अनावरणही मोठया दिमाखामध्ये करण्यात आले.

सकाळी पोलादपूर शहरामध्ये छ.शिवाजी महाराजांची महाआरती सर्वपक्षिय व सर्व क्षेत्रातील पोलादपूरवासियांनी उपस्थित राहून मोठया भक्तीभाव आणि स्फूर्तीने म्हटली. यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश कोळसकर, अमोल भुवड, ऍड.सचिन गायकवाड, सिध्देश शेठ, माजी नगराध्यक्ष निलेश सुतार, दर्पण दरेकर, स्वप्नील चोरगे, भाई जगताप, लक्ष्मण मोरे, विनायक दिक्षित, बेलोसे आणि असंख्य क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत कळंबे यांच्याहस्ते छ.शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळयासमोर श्रीफळ वाढवून महाआरतीचा शुभारंभ करण्यात आला.

यानंतर हॉटेल बालाजीलगतच्या भव्य शामियान्यात पीटीपीएल पार्ट-टू चे ऑक्शन सुरू करण्यापूर्वी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यमुद्रेतील ट्रॉफीचे अनावरण भव्य स्वरूपात करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा, क्रिकेट संघाचे कॅप्टन, मालक तसेच खरेदीदारांचा स्वागत सत्कार करण्यात आला. मागील वेळीच्या विजेत्यांसह सुमारे 24 संघांचा सहभाग यावेळी दिसून आला. याप्रसंगी बेसबॉलच्या भारतीय संघातील खेळाडू विनीत सकपाळ यांच्यासह प्राथमिक शिक्षक सचिन दरेकर, माध्यमिक शिक्षक येरूणकर, ढाणे आणि तुळसुळकर यांचाही सत्कार करण्यात आला.

Exit mobile version