कळंबोली वाहतूक विभागाचा जनजागृती उपक्रम
। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कळंबोली वाहतूक विभागाच्या वतीने कामोठे येथील एम.एन.आर. स्कूलमध्ये विशेष वाहतूक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी, वाहतूक सिग्नलचे पालन, झेब्रा क्रॉसिंगचा योग्य वापर तसेच दुचाकीवर हेल्मेट आणि चारचाकीमध्ये सीटबेल्ट वापरण्याचे महत्त्व अतिशय सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगण्यात आले. वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक असलेल्या नियमांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून वाहतूक नियमांविषयी अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना स्वतः वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच आपल्या पालकांनाही हेल्मेट, सीटबेल्ट आणि वाहतूक शिस्तीचे महत्त्व समजावून सांगण्याचे आवाहन केले.
अशा जनजागृती उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्तीची जाणीव अधिक दृढ होईल आणि भविष्यात जबाबदार व सुरक्षित नागरिक घडण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास कळंबोली वाहतूक विभागाने व्यक्त केला.
