| पनवेल | प्रतिनिधी |
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने पनवेल रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाद्वारे अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर फसवणुकीपासून बचाव तसेच सुरक्षित रेल्वे प्रवासाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात जनजागृती फलक घेऊन प्रवाशांशी संवाद साधला. कोणतेही अंमली पदार्थ शरीरासाठी घातक असून, त्याचा परिणाम केवळ व्यसनाधीन व्यक्तीवरच नव्हे तर, संपूर्ण कुटुंबावर होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच भारतातील एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत अंमली पदार्थांचे सेवन व बेकायदेशीर व्यवहार हा दंडनीय गुन्हा असल्याची माहिती देण्यात आली. रेल्वे प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तीकडून खाद्यपदार्थ किंवा पेय स्वीकारू नये. अंमली पदार्थांची वाहतूक किंवा सेवन आढळल्यास रेल्वे पोलीस हेल्पलाइन 1512 तसेच अंमली पदार्थ हेल्पलाइन 1933 वर तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
यासोबतच सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी ओटीपी, यूपीआय पिन किंवा बँकेची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, अज्ञात लिंक किंवा क्यूआर कोड स्कॅन करू नये, सार्वजनिक फ्री वाय-फाय वापरताना सतर्क राहावे तसेच संशयास्पद कॉल किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये, अशा महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अभियानात गोपनीय शाखेचे अंमलदार जाकीर शेख, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि 22 पोलीस अंमलदार सहभागी झाले. प्रवाशांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून समाजघडणीसाठी अशा जनजागृती मोहिमा प्रभावी ठरत असल्याचे मत व्यक्त केले. सायबर फसवणूक झाल्यास राष्ट्रीय हेल्पलाइन 1930 तसेच महाराष्ट्र सायबर हेल्पलाईन 1945 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती अभियान
