सानेगाव आश्रमशाळेत जनजागृती अभियान

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा; शिक्षणालाच प्राधान्य द्या

| चणेरा | प्रतिनिधी |

डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी रोहा तालुक्यातील सानेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत जनजागृती अभियान उत्साहात पार पडले. दरम्यान, सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा, शिक्षणालाच प्राधान्य द्या, असे आवाहन पोलीस उपनिरीक्ष विनोद गायकवाड यांनी केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना सुरक्षित इंटरनेट वापर, ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव, सोशल मीडियावरील धोके तसेच कायदेशीर मदतीची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात विद्यार्थीदशा ही आयुष्य घडविण्याचा सुवर्णकाळ असल्याचे सांगत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शालेय शिस्त, नियमांचे पालन आणि शिक्षणामुळे होणारी वैयक्तिक तसेच सामाजिक प्रगती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अनावश्यक गोष्टींपासून दूर राहून शिक्षणालाच सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक विनोद गायकवाड यांनी सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, मोबाईल व इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी, ऑनलाइन फसवणूक आणि सोशल मीडियावरील वाढते धोके याविषयी सविस्तर माहिती दिली. सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यास तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस हवालदार सुनील सकपाळ यांनी व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच पोक्सो कायद्यांतर्गत बालकांचे हक्क व संरक्षण याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जबाबदार आणि जागरूक नागरिक म्हणून कायद्याचे पालन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका विजया पाटील, मेलजोल प्रकल्प समन्वयक प्रतीक कोळी, फॅसिलिटेटर महेश बांगारे, विभा भातिकर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक मिलिंद पाटील यांनी केले.

सायबर गुन्हे दिवसेंदिवस अधिक क्लिष्ट होत आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि इंटरनेटचा वापर जबाबदारीने करणे आवश्यक आहे. कोणत्याही संशयास्पद लिंक, कॉल किंवा संदेशांना प्रतिसाद देऊ नये. सायबर फसवणूक झाल्यास वेळ न दवडता 1930 या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास नुकसान टाळण्यास मोठी मदत होते.

विनोद गायकवाड,
पोलीस उपनिरीक्षक
Exit mobile version