। पनवेल । वार्ताहर ।
तुर्भे वाहतुक विभागातर्फे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधुन जनतेमध्ये व वाहन चालकांमध्ये वाहतुक सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण व्हावी, तसेच रस्ते अपघात व त्यात जखमी होणारे व मृत्यूमुखी पडणारे नागरिकांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने नागरिकांना वाहतूक सुरक्षेविषयी व नियमांविषयी साक्षर करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या दृष्टीने वाहतुक शाखेचे पोलीस उप आयुक्त तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या दिवशी सानपाडा जंक्शन या ठिकाणी विना हेल्मेट, सिटबेल्ट, गणवेश तसेच ओळखपत्र न वापरणार्या रिक्षा चालक तसेच इतर वाहन चालकांना थांबवुन त्यांना याबाबतचे महत्व पटवुन सांगण्यात आले. तसेच, वाहतुकीचे नियम पाळुन स्वत:ची व इतरांची रक्षा करावी म्हणुन त्यांना राखी बांधण्यात आली. वाहतुक सुरक्षेविषयी जनजागृतीचे उपक्रमाचा उद्देश हा या एका दिवसापुरता मर्यादीत न राहता ते कायमस्वरूपी नागरीकांनी वाहतुकीचे नियम पाळावे असा आहे. तसेच, नियम न पाळणार्यासाठी नेहमीच कायदेशीर कारवाई करण्यात येत असते. परंतु, आज वेगळया पध्दतीने म्हणजेच राखी बांधुन वाहतुकीविषयक प्रबोधन करण्यात आले.
या उपक्रमादरम्यान तुर्भे वाहतुक शाखेचे वपोनि श्रीकांत धरणे यांनी वाहतुकीबाबत वाहनचालकांना प्रबोधन केले. यावेळी तुर्भे वाहतुक शाखेचे पोउपनि दयानंद महाडेश्वर, सफौ पाटील, पोहवा वैभव पोळ, पोना संदिप काळे, पोना दिपक गोडेे, पोना योगेश्वर ठाकुर, पोशि अमित सुर्वे, पोशि राजेंद्र जाधव, पोशि प्रशांत सुर्वे, पोशि लक्ष्मण देवकाते, पोशि रामदास ढेपे व मपोशि रेखा गोसावी उपस्थित होते.