। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ गावात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून डेंग्यू झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून डेंग्यू डासांच्या निर्मूलनासाठी नेरळ गावात जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच नेरळ विद्या विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी चौका-चौकात पथनाट्य सादर करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
मागील महिनाभरात नेरळ गावात डेंग्यू सदृश्य रुग्णांत वाढ झाली आहे. त्यात डेंग्यूने दोन रुग्णांचा बळी घेतला असून आजपर्यंत साधारण दहाहून अधिक रुग्णांना डेंग्यू झाला होता. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील डेंग्यू सदृश्य डासांचा नायनाट व्हावा, यासाठी कोणत्या उपाययोजना ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी केल्या पाहिजेत. याची जनजागृती करण्यासाठी पथनाट्ये करण्यात आली. या जनजागृती रॅलीमध्ये नेरळ ग्रामपंचायत, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र, नेरळ ग्रामपंचायत हद्दी मधील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, स्थानिक रहिवाशी आणि विद्या विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ग्रामपंचायत कार्यालयातून निघालेली जनजागृती रॅली कुंभारआळी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक तेथून नेरळ माथेरान रस्त्याने हुतात्मा हिराजी पाटील चौक, लोकमान्य टिळक चौकातून गणेश मंदिर हेटकर आळी अशी जुनी बाजारपेठ येथून पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात पोहचली. या रॅलीमध्ये सरपंच उषा पारधी, ग्रामविकास अधिकारी अरुण कारले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच विद्या विकास शाळेचे मुख्याध्यापक सहभागी झाले होते.