मानसिक आजार मुक्तीसाठी जनजागृती

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा पुढाकार

| अलिबाग | प्रमोद जाधव |

वाढत्या मानसिक आजारावर अंकुश ठेवण्यासाठी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. मानसिक आजार मुक्तीसाठी फलकांद्वारे जनजागृती व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक आत्महत्या प्रतिबंध सप्ताहानिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मोबाईलच्या जगतामध्ये नागरिक एकमेकांपासून जवळ आला असला, तरीही एकमेकांचे संवाद कमी झाले आहे. विभक्त कुटूंब पध्दतीमुळे व्यक्त होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नैराश्यपोटी आत्महत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2022 ते सप्टेंंबर 2023 या कालावधीत 108 जणांनी नैराश्यामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यात 49 पुरुष व 59 महिलांचा समावेश आहे.

आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम सुरु करण्यात आले आहे. 10 ते 16 सप्टेंबर या कालावधीत आत्महत्या प्रतिबंध सप्ताह सुुरू केला आहे. या सप्ताहाचा शुभारंभ गुरुवारी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आला. या सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम सुरु केले आहेत. आत्महत्या न करण्याचा संदेश वेगवेगळ्या फलकांमार्फत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारीकांच्याद्वारे हा संदेश गावागावात पोहचविण्यासाठी पुढाकार घेण्यात आल आहे. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 16 सप्टेंबरपर्यंत उपक्रम राबविले जाणार आहेत.

14416 नंबर ठरतोय वरदान

मानसिक आरोग्यसंबंधीत मोफत मार्गदर्शन करण्यासाठी 14416 हा टोल फ्री क्रमांक सुुर करण्यात आला आहे. मानसिक आजाराच्या आहारी जाणाऱ्यांना या क्रमांकाच्यामार्फत मार्गदर्शन करून त्यांची आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 60 जणांना मार्गदर्शन करून त्यांचे मानसिक संतूलन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हा क्रमांक मानसिक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.

व्यक्त होणे काळाची गरज

शारिरीक आजार हे सहज दिसून येणारे आहेत. त्यावर उपचारही वेळेवर करता येतो. परंतु मानसिक आजार दिसून येत नाही. नैराश्याने अनेक जण जीवन संपविण्याचा प्रयत्न करतात. आत्महत्या हा एक क्षणाचा निर्णय आहे. मात्र त्यामुळे खुप मोठी हानी कुटूंबाची होते. याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. मानसिक आजारावर उपचार म्हणजे आपण बोलके होणे आवश्यक आहे. व्यक्त होणे ही काळाची गरज आहे, असे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पुर्वा पाटील यांनी सांगितले.

बदलत्या राहणीमानामुळे मनमोकळेपणाने संवाद करणे थांबले आहे. त्यामुळे मानसिक तणावातून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. नैराश्य हा मानसिक आजार आहे. मनाने खचून न जाता. प्रत्येकाने संवाद साधला पाहिजे.

डॉ. अर्चना सिंह, मानसोपचार तज्ञ


Exit mobile version