पंचनाम्याचे थोतांड थांबवा-उद्धव ठाकरे

| नागपूर | प्रतिनिधी |
मुख्यमंत्र्यांनी एक रुपयात विमा योजना आणली. त्या अंतर्गत पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी विमा घेतला. त्यापोटी 8 हजार कोटींचा हिस्सा सरकारने भरला. जनतेचा हा पैसा सरकारच्या मित्रांच्या कंपन्यांच्या खिशात गेला का, असा सवाल शिवसेनाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी केला. या सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा असेल, तर पंचनाम्याचे थोतांड बंद करून कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

ठाकरे हे सोमवारी विधानभवन परिसरात बोलत होते. पिकांचे नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत कळवा, असे विमा कंपन्या म्हणतात. पण 72 तासानंतरही विमा कंपन्यांचे फोन आणि दारे-खिडक्या बंद आहेत, असे ते म्हणाले.

अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढला आहे. बँकांकडून कर्जाचा तगादा लावला जात आहे. आज त्यांचा कुणीही वाली नाही. शेतकरी आपले अवयव विकायला तयार झाले आहेत. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही शेतकऱ्यांवर आली नव्हती. मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती. आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे की, ज्यांना-ज्यांना आरक्षण हवे आहे त्यांना-त्यांना देण्यात यावे. पण, दुसऱ्या कुणाचे आरक्षण कमी न करता ते देण्यात यावे, अशी भूमिका असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

भाजपने नवाब मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आम्ही आदर करतो. पण, नवाब मलिकांना जो न्याय लावला, तो प्रफुल्ल पटेलांना लावून तुम्ही त्यांच्यापासून अंतर ठेवणार का, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. 370 कलम हटविले गेल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याचा आनंद आहे. सर्वोच्च न्यायालयाला मी धन्यवाद देतो. ते कलम हटविण्यासाठी शिवसेनेचाही आग्रह होता. आम्हीदेखील त्यांचे समर्थन केले होते. त्यामुळे आता मोकळ्या वातावरणात तिथे निवडणुका होतील, असेही ठाकरे म्हणाले.

Exit mobile version