| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत फरक जाणवतो आहे. जवळपास 76 लाख मतदान वाढलं आहे. मग मतदानाची ही वाढ कशी झाली? त्यामुळे आयोगाच्या पारदर्शकेतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जनतेची मते चोरण्याचे आणि डाका टाकण्याचे काम आयोगाने केल्याचा आरोप गुरुवारी (दि. 28) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. याविरोधात आमचे आमदार आणि उमेदवार कोर्टात जाणार आहेत, असे पटोले यांनी यावेळी सांगितले.
पटोले म्हणाले की, 7.87 टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. 76 लाख मते संध्याकाळी पाच-सहाच्या दरम्यान पडलेली आहेत, याची कोणतीही माहिती निवडणूक आयोगाकडे नाही. महाराष्ट्रात पाच लाखांहून अधिक मतं आली, मग ती आली कुठून? असा सवालही त्यांनी केला. आता आम्हाला जे सांगितलं जातं की रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मतदान झालं. मग कमीत कमी दोन ते तीन किलोमीटरच्या मतदारांच्या रांगा असतील. मग निवडणुका पारदर्शक घेण्यासाठी निवडणूक आयोग फोटो, व्हिडीओ वैगेरे काढत असतं. मग निवडणूक आयोगाने आम्हाला रात्री मतदारांच्या रांगा लागल्या होत्या की नाही, म्हणजे संध्याकाळपर्यंत मतदानाची आकडेवारी 58.22 टक्के होत असेल तर मग असं काय झालं की रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मतदान झालं?, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.
सात वाजता मतदान झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट उशिरा देण्यात आला. निवडणूक आयोगाने सायंकाळी 5 वाजता 58.22 टक्के मतदानाची टक्केवारी दिली. परंतु, 62.2 टक्के मतदान झाल्याचे त्यांनी रात्री 11.30 वाजता सांगितले. यावरून साडेसहा तासांमध्ये मतदान करुन घेतल्याचे समोर येते. तर, दुसर्या दिवशी आयोगाकडून सांगितले जाते की, 66.5 टक्के मतदान झाले. मतदान झाल्यानंतर मतदानाची माहिती निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेत दिली जाते, ही पद्धत आहे. परंतु, महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकाराची पत्रकार परिषद घेतलेली नाही. सुमारे 76 लाखांची मतांची वाढ झालेली आहे. त्यामुळे आयोगाच्या पारदर्शकेतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जनतेची मते चोरण्याचे आणि डाका टाकण्याचे काम आयोगाने केल्याचे यातून सिद्ध होत आहे. याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
महाराष्ट्र ताब्यात घेण्याचे 2020 ला भाजपचे ठरले होते. पक्ष फोडले, चिन्ह घेतले, न्यायव्यवस्था हाती घेतली. सर्व बेकायदेशीर असून, सर्वोच्च न्यायालय लक्ष द्यायला तयार नाही. असेच सर्व सुरु राहिल्यावर राजकारणात राहायचं कशाला?
नाना पटोल,
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष







