मालमत्ता कर वाढीविरोधात जनतेतून उद्रेक

जनसुनावणी तात्काळ रद्द, संतप्त नागरिकांकडून निषेध

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पाली नगरपंचायत प्रशासन आणि नगररचनाकार कार्यालय अलिबाग यांच्या माध्यमातून मालमत्ता करवाढीच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. 12) भक्तनिवास क्रमांक 1 मध्ये जनसुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र, या जनसुनावणीत जुलमी मालमत्ता करवाढीविरोधात पालीकर जनतेत प्रचंड असंतोष व संताप पाहावयास मिळाला. जुलमी करवाढ रद्द करावी, या मागणीसह पाली नगरपंचायत प्रशासनाचा नागरिकांनी यावेळी निषेध व्यक्त केला.

पाली गावचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. मात्र, नगरपंचायत होऊन पालीचा सर्वांगीण शाश्वत विकास होईल, अशी जी अपेक्षा जनतेला होती, ती अपेक्षा धुळीस मिळाली आहे. पालीत अद्याप कुठल्याही पायाभूत नागरी मूलभूत सुविधा देण्यात पाली नगरपंचायत अपयशी ठरली आहे. पालीकरांना स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी, सांडपाण्याचा निचरा, वाहतूक कोंडीसह अन्य समस्येची सोडवणूक नगरपंचायत प्रशासनाकडून होत नाही, विकासाच्या अपेक्षांचा जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे या जनसुनावणीत नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यामुळे सदरची जनसुनावणी रद्द करण्यात आली. यावेळी संतप्त नागरिकांनी गदारोळ करीत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना कपिल नारायण पाटील म्हणाले की, आम्ही सर्व पालीकर नागरिक आमच्या समस्या मांडत आहोत. पाली नगरपंचायत प्रशासनाकडून प्रस्थापित करवाढ ही गेल्या ऑक्टोबर 2024 मध्ये नोटीसीमार्फत देण्यात आली होती. आज जनसुनावणी घेण्यात आली, या मालमत्ता करवाढीला आमचा तीव्र विरोध आहे. जनतेला कोणत्याही पायाभूत नागरी सुविधा मिळत नाहीत. शुद्ध पाणी योजना नाही, प्रत्येकाच्या घरात गढूळ पाणी पुरवठा होत आहे, सार्वजनिक उद्यान नाही, वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे, अतिक्रमणरहित रस्ते आहेत, आम्ही सतत तक्रारी करून नगरपंचायत दुर्लक्ष करीत आहे, सदरची करवाढ 200 टक्के, 600 टक्के, 800 टक्के जुलमी आहे. सदरची सुनावणी वेगवेगळ्या वेळेत घेण्यात आली आहे. यामागे षड्यंत्र काय, एकत्रित जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत. पाली नगरपंचायत क दर्जाची असून, कोणत्याही करवाढीस पात्र नाही. तरी, ही करवाढ का केली जाते, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. विनायक सोनकर म्हणाले की, आम्ही हायवेलगत राहात नाही, गल्लीत राहतो, लाकडी घरात राहतो, मात्र आमचे स्लॅबचे घर दाखवून सातपट करवाढ केली आहे, याचा निषेध करतो. या जनसुनावणीवेळी नगर रचनाकार थोनटे, नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके, नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार आदींसह पालीकर नागरिक मोठ्या संख्येने होते.

आजची मालमत्ता कर वाढीसंदर्भातील जनसुनावणी रद्द करण्यात आली आहे. ही जनसुनावणी पुन्हा एकदा घेण्यात येईल. यावेळी उपस्थित पालीकर जनतेने समस्या व हरकती मांडल्या. त्या अनुषंगाने पाली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा होईल, त्या सभेत याबाबत निर्णय घेण्यात येतील.

माधुरी मडके,
मुख्याधिकारी, पाली नगरपंचायत

कर आकारणीकरिता जे झोनिंग झाले आहे, त्याचे रिझोनिंग करून कर आकारणी करावी तसेच नागरिकांच्या मागणीप्रमाणे कमीत कमी कर आकारणी करावी, असा प्रयत्न नगरपंचायतीतील सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन येत्या सर्वसाधारण सभेत करआकारणी कमीत कमी व्हावी अशी मागणी आम्ही करणार आहोत. लोकभावनांचा आदर करीत शक्य ते सर्व प्रयत्न आम्ही करू.

पराग मेहता,
नगराध्यक्ष

Exit mobile version