पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ऐतिहासिक जनआंदोलन
| पालघर | प्रतिनिधी |
वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात सोमवार (दि. 19) पालघर जिल्ह्यात तीव्र जनआक्रोश पाहायला मिळाला. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हजारो नागरिकांनी एकत्र येत भव्य आणि ऐतिहासिक जनआंदोलन उभारले. शेतकरी, मच्छिमार, आदिवासी बांधव, पर्यावरणप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांचा या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिक शेतजमिनी, समुद्रकिनारा, मच्छिमारांची उपजीविका तसेच पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. हा प्रकल्प विकासाच्या नावाखाली होणारा विनाश आहे, अशा जोरदार घोषणा आंदोलनस्थळी दिल्या गेल्या. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत सरकारने हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी ठाम मागणी केली. स्थानिक ग्रामसभा, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी यावेळी एकत्र येत प्रकल्पाविरोधात एकजूट दाखवली. आंदोलन शांततेत पार पडले असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले आहे. वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातील हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. आजचे आंदोलन हे या जनलढ्याचे महत्त्वाचे आणि निर्णायक पाऊल मानले जात आहे.







