भूजल संवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – डॉ. किरण पाटील

| अलिबाग | वार्ताहर |
पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे, त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. भूजल सर्वेक्षण अणि विकास यंत्रणेच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, अलिबाग-रायगड व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आायेजित रायगड जिल्ह्यातील भूस्तरीय रचना व पाऊस पाणी संकलन व पाणी गुणवत्ता या विषयांवरील जिल्हास्तरीस ऑनलाईन वेबिनारमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले.
रायगड जिल्हा हा जरी जास्त पर्जन्यमानाच्या विभागात मोडत असला तरीही येथील भौगोलिक रचनेमुळे पावसाचे पाणी वाहून जाते. परिणामी, दुष्काळ व पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. पावसाळ्यात पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून पाण्याचे संकलन करणे व त्याद्वारे भूजल पुनर्भरण करणे आवश्यक आहे. यासाठी तालुकास्तरांवर गटविकास अधिकारी यांनी योग्य नियोजन करावे. पाणी बचत तसेच टंचाई निवारणासाठी लोकसहभागातून पाणी स्त्रोत बळकटीकरण तसेच तलावातील गाळ काढण्याची कामे, भूजल संवर्धनाकरिता प्रत्येक शासकीय तसेच खासगी इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, बोअरवेल रिचार्ज, वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन इ. कार्यक्रमही हाती घेतले पाहिजे. पाण्याच्या शुद्धतेसाठीची जाणीव व पाण्याचा योग्य वापराविषयीचे ज्ञान याकरिता ग्रामपंचायतस्तरावर याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी जास्तीत जास्त लोकसहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. किरण पाटील यांनी केले.

यावेळी वेबिनारचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, अलिबागचे एच.एम. संगनोर, श्रीमती एस.एस.पासलकर कनिष्ठ रसायनी, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, कोकण भवन, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेबिनारकरिता सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, बीआरसी, सीआरसी व जलसुरक्षक दूरचित्रवाणीच्या माध्यमातून उपस्थित होते.

Exit mobile version