तालुक्यात पाणीटंचाईचे गंभीर संकट; भविष्यात पाणीपुरवठा खंडित होण्याची भीती
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने शहरासह तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गंभीर होत असताना श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सार्वजनिक विहिरींच्या दुरवस्थेकडे प्रशासन व नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नगरपरिषदेच्या शहरातील विविध भागांत सुमारे 35 सार्वजनिक विहिरी असून, त्यापैकी काही विहिरींना शंभर वर्षांहून अधिक काळ झाला आहे. अनेक विहिरींमध्ये सांडपाणी, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या व इतर कचरा साचल्याने जीवनदायी जलस्रोतांना कचराकुंडीचे स्वरूप आले आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारे रानवली धरण आटल्याने सध्या एक दिवसाआड केवळ एक तास पाणीपुरवठा केला जात आहे. भविष्यात पाणीपुरवठा पुर्णपणे खंडित होण्याची शक्यता असल्याने नागरिक सार्वजनिक विहिरींकडे पर्यायी जलस्रोत म्हणून पाहत आहेत. मात्र, काही विहिरींचे झरे बुजले असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यासह कपडे धुणे किंवा अन्य घरगुती वापरासाठी ही अयोग्य ठरत आहे.
कोकणच्या संस्कृतीत विहिरींना जलदेवतेचे स्थान असून, चैत्र पौर्णिमेला त्यांची पूजा करण्याची शतकानुशतकांची परंपरा आहे. अशा विहिरींची आज झालेली दयनीय अवस्था चिंताजनक आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागातही नगरपरिषदेच्या विहिरी आहेत. सर्वसाधारण सभांमध्ये विविध विकासकामांचे मुद्दे अजेंड्यावर घेत असताना विहिरींच्या स्वच्छता व संवर्धनाचा मुद्दा ठोसपणे उपस्थित होत नसणे हे श्रीवर्धन येथील नागरिकांचे दुर्दैव आहे.
रानवली धरण जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. जलशुद्धीकरण प्रकल्प असूनही वारंवार गढूळ पाणी येणे. तसेच, पाण्याचा दाब वाढवल्यानंतर जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत असल्याने जलवाहिन्यांच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. या कामांमध्ये कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले आहेत; त्याबाबत संबंधितांकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे. नगरपरिषदेने सार्वजनिक विहिरींची तातडीने स्वच्छता करावी, गाळ काढावा, बुजलेले झरे मोकळे करावेत, जंतुनाशक औषधांची प्रक्रिया करावी आणि विहिरींचे नियमित संवर्धन करावे. केवळ रानवली धरणावर अवलंबून न राहता सार्वजनिक जलस्रोतांचा उपयोग वाढवून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
श्रीवर्धन नगर परिषद हद्दीतील एकूण सार्वजनिक विहिरी. :- 35.
सांडपाणी गेल्यामुळे दुरावस्था झालेल्या विहिरी. :-08.
पायातून ढासळलेल्या विहिरी. :- 06.
झरे आटलेल्या विहिरींची संख्या. :- अंदाजे 13.
विहिरींचे पुनरुज्जीवन व संवर्धन नक्कीच केले जाईल.श्रीवर्धन येथील नागरिक पाण्यापासून वंचित राहणार नाही याची नगरपरिषदेकडून दखल घेतली जाईल. भविष्यातील पाणीटंचाई बघता नगरपरिषदेने त्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
अनंत गुरव
उपनगराध्यक्ष श्रीवर्धन नगरपरिषद






