सार्वजनिक बांधकाम खात्याची इमारत धोकादायक

उंदीर, घुशी, विंचू, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर

। उरण । वार्ताहर ।

उरण तहसील कार्यालय आणि उरण पोलीस ठाण्यालागत असलेली इमारत खंडर बनली आहे. त्यामुळे तिथे उंदीर, घुशी, विंचू, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या जनतेच्या आणि कार्यालयामधील कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली उरण तहसील कार्यालगत असणाऱ्या इमारतीमध्ये इंग्रज राजवटीत शासकीय कार्यालयाचे कामकाज सुरू होते. मात्र, त्यानंतर अनेक वर्षांपासून तेथील कार्यालयाचे कामकाज बंद असल्यामुळे इमारत मोडकळीस येऊन बंद स्थितीत आहे. इमारतीचे दरवाजे, खिडक्या नाहीशा झाल्या आहेत. आजूबाजूला घाणीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे सदर इमारती परिसरात उंदीर, घुशींबरोबर विंचू, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला असून, इमारत संपूर्ण खंडर बनली आहे.

दिवसभरात हजारो नागरिकांचा वावर या दोन्ही कार्यालयांमध्ये होत आहे. येणारा नागरिक पार्किंगसाठी येथे वाहने उभी करत असतात. त्या वाहनांमध्ये विंचू, साप घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच या कार्यालमधील कर्मचारी काम करीत असताना कामामध्ये मग्न असतात. याच वेळेला खिडकीतून, विंचू, साप जाऊन कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करु शकतात. त्यामुळे ही इमारत जमीनदोस्त करुन परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिक, कर्मचारी करीत आहेत.

सार्वजनिक बांधकाम उरणचे उपअभियंता नरेश पवार यांच्याकडे या इमारतीसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे या इमारतीच्या माध्यमातून शासकीय अधिकारी, कर्मचारी, सर्वसामान्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे कार्यालय येथे अनेक वर्षांपासून बंद आहे. इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे. आजूबाजूला स्वच्छता नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उंदीर, घुशींबरोबर विंचू, सापांचा वावर वाढला आहे. येथे येणाऱ्या नागरिकांबरोबर कर्मचाऱ्यांना कधीही सापाचा दंश होऊ शकतो. त्यामुळे सदर इमारत पाडून परिसराची स्वच्छता करावी, तसेच शासकीय कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

सतीश निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण
Exit mobile version