सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ

नोटीसमध्ये वेगळी तर ऑनलाईवर वेगळी तारीख

| अलिबाग | प्रतिनिधी |

गेल्या वर्षभरापासून सार्वजनिक बांधकाम विभाग वारंवार वेगवेगळ्या वादग्रस्त कारणामुळे चर्चेत येऊ लागला आहे. करोडो रुपयांच्या कामांची निवीदा काढताना वेगळी तारीख आणि ऑनलाईनवर अपलोड करताना वेगळी तारीख असा प्रकार घडल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा चर्चेत आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावळागोंधळा बाबत नाराजीचे सूर उमटत आहेत.

लोकसभा निवडणूकांचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो. त्याअगोदर शासनाकडून आलेला निधी खर्च करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयारी सुरु केली आहे. अलिबाग व मुरुड तालुक्यातील कामांची निविदा काढण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील कामांसह साळाव-मुरूड रस्ता अशा अनेक कामांसाठी दहा कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जाणार आहे. त्या कामांची निविदा ऑनलाईन पध्दतीने काढण्याची प्रक्रीया गेल्या दहा दिवसांपासून सुरु आहे. या कामांची निविदांची तारीख नोटीसीमध्ये दहा जानेवारी अशी आहे. तर ऑनलाईन निविदांची तारीख 12 जानेवारी अशी आहे. निविदा मागविण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत आहे. मात्र नोटीसीमध्ये वेगळी तारीख आणि ऑनलाईनमध्ये वेगळी तारीख सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी निधी खर्च करण्याच्या गडबडीत केलेल्या या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ उघड झाला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्थानिकांना डावलून मुंबई कल्याण येथील मर्जीतील ठेकेदारांना काम देणे, रंगकाम व इतर कामांची निविदा न काढणे असा अनेक प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

वेगवेगळ्या कामांसाठी निविदा काढण्यात आली आहे. ऑनलाईन पध्दतीने अपलोड करण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे तारीख दोन दिवस उशीरा पडली आहे. मात्र त्यावर शुध्दीपत्रक काढली जाणार आहे.

के. ई. सुखदेवेए कार्यकारी अभियंता
Exit mobile version