सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथानपणा उघड

स्लॅब ड्रेनचे काम न केल्याने पाणी रस्त्यावर

| आगरदांडा/कोर्लई | प्रतिनिधी |

बोर्ली मांडला रस्त्यावरील स्लॅब ड्रेनचे काम मंजूर झाले होते. सदरचे काम मेअखेरपर्यंत पूर्ण करणे खूप आवश्यक होते. परंतु, या कामाकडे बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने सदरचे काम पूर्ण होऊ शकले नाही. आज जर हे का पूर्ण झाले असते, तर संपूर्ण पावसाचे पाणी या स्लॅब ड्रेनमधून वाहून गेले असते. परंतु काम न केल्याने सर्व पाणी बोर्ली बाजारपेठेत घुसत असून, सर्व दुकानांमध्ये पाणी शिरून मालमत्तेचे नुकसान होणार आहे. या नुकसानीची भरपाई मुरुड सार्वजनिक बांधकाम खात्याने करून द्यावी, अशी लेखी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरुड तालुका सचिव राजेश तरे यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, मागील वर्षी पाऊस जेव्हा 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पडला होता, त्यावेळी बोर्ली नाका व आजूबाजूच्या परिसरात दुकानामध्ये पाणी शिरून लाखो रुपयांचे दुकानदारांचे नुकसान झाले होते. रस्त्याची उंची व असणारी दुकाने जमीन पातळीवर समान असल्याने पाऊस जास्त पडल्यास असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी शिरण्यास वेळ लागत नाही. यासाठीच राज्य शासनाकडून पाणी व्यवस्थित वाहून जाण्यासाठी स्लॅब ड्रेनच्या कामासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करूनसुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम पूर्ण न केल्याने दुकानदारांच्या मालास मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी बांधकाम खात्याने पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी व जलद व्यवस्था करावी अन्यथा दुकानदारांचे नुकसान झाल्यास बांधकाम खात्याला जबाबदार धरून आर्थिक भरपाई द्यावी लागेल, असा इशारा राजेश तरे यांनी दिला आहे.

Exit mobile version