शिक्षणवेध अंकाचे प्रकाशन

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव तालुक्यातील रा.जि.प. शाळा रूद्रवली येथे तळाशेत केंद्राची शिक्षण परिषद बुधवार (दि.24) संपन्न झाली. रुद्रवली शाळेच्या शिक्षणवेध नावाच्या वार्षिक पुस्तिका अंकाचे प्रकाशन करण्यात आले. शाळेचे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे लेख, कविता, मनोगत व शैक्षणिक उपक्रमाचे फोटो असलेल्या शिक्षणवेध वार्षिक पुस्तिकेचे शिक्षण परिषदेतील मान्यवरांनी विशेष कौतुक केले. तसेच तहसिलदार, माणगाव यांनी सुरू केलेल्या महसूल मित्र उपक्रमांतर्गत रुद्रवली शाळेच्या विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. महसूल मित्र उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याना दाखले वाटप करणारी रुद्रवली शाळा ही तालुक्यातील पहिलीच शाळा असल्याचे केंद्रप्रमुख यांनी सांगितले. या शिक्षण परिषदेत केंद्रातील शिक्षकांनी विषयतज्ञ शिक्षकांच्या मदतीने विविध शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण केली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल गुरव यांनी केले तर सूत्रसंचालन प्राजित पवार यांनी केले. रुद्रवली शाळेत आयोजित शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती रूद्रवली व सर्व महिला पालक वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version