सत्तेच्या उन्मादाला खाली खेचा

शरद पवारांचा कोल्हापुरात हल्लाबोल

| कोल्हापूर | प्रतिनिधी |

शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या, महगाईला कारणीभूत असणाऱ्या आणि तपास यंत्रणांचा धाक दाखवून विरोधकांना नाहक त्रास देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला आगामी निवडणुकांमध्ये धडा शिकविण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी कोल्हापूर येथे केला. मोदी सरकारला सत्तेचा उन्माद चढला असून, आगामी निवडणुकांमध्ये त्यांना खाली खेचा, असा जोरदार हल्लाबोल पवार यांनी केला.

कोल्हापूर येथील दसरा चौकात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. हे सरकार सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे महागाईसारखे प्रश्न गंभीर बनलेले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला मोदी सरकारला जराही वेळ नाही. उलट, शेतीमालाचे भाव वाढले म्हणून आरडाओरड भाजपकडूनच केली जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले. कांद्याचे वाढलेले दर, साखर निर्यात आदी मुद्द्यांवरही त्यांनी आपले रोखठोक मत मांडले.

राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावरुन त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांना विविध सरकारी यंत्रणांचा धाक दाखवून नामोहरम करण्याचे काम हे राज्यकर्ते करीत आहेत. जे आपल्या गटात येत नाहीत, त्यांना प्रसंगी तुरुंगातही टाकले जात आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनिल देशमुख आहेत, असे त्यांनी सूचित केले. राज्याचा गृहमंत्री वर्ष-दीड वर्षे तुरुंगात जातो, हे भाजपला न शोभणारे आहे, असे ते म्हणाले. पण, देशमुख यांनी स्वाभािमानाची भूमिका स्वीकारल्याबद्दल पवारांनी त्यांचे जाहीर कौतुकही केले.

मुश्रिफांना टोला
हसन मुश्रिफ यांनी स्वीकारलेल्या भूमिकेवरही पवार यांनी जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी भोपाळमध्ये राष्ट्रवादीने 70 हजार कोटींचा घोटाळा केला असे जाहीर करताच कोल्हापुरातील आमचे सहकारी भाजपच्या गोटात सहभागी झाले. त्यांच्या पत्नीने कारवाईच्या वेळी आम्हाला गोळ्या का घालत नाहीत, असे घराबाहेर येऊन पोलीस यंत्रणेला ठणकावून सांगितले होते. पण, तेवढे धाडस घरप्रमुखाने केले नसल्याची टीकाही पवार यांनी केली. जर खरोखरच यांनी गैरव्यवहार केला असेल, तर मोदींनी त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि सत्य जनतेसमोर आणाावे, अशी मागणी पवारांनी केली.

सत्तेच्या उन्माद चढलेल्या या राज्यकर्त्यांना सत्तेवरुन पायउतार करायचे आहे, याची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या कर्मभूमीतूनच करावी. शाहू महाराज हे सत्याच्या मार्गाने चालणारे राजकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या विचारांचे पाईक असणारे कोल्हापूरकर सत्तेच्या उन्मादाला निश्चित खाली खेचतील.

शरद पवार

अजित पवारांना पुन्हा प्रवेश नाही
सातारा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांना पुन्हा पक्षामध्ये प्रवेश देणार नाही, असे स्पष्ट केले. यापूर्वी ते दोन वेळा चुकले होते, पण त्यांना सुधारण्याची संधी दिली होती. पण, तीच चूक त्यांनी पुन्हा केली आहे. त्यामुळे पुन्हा अशी संधी देणे, उचित ठरणार नाही, असे पवारांनी सांगितले.

आमदार, खासदारांवर कारवाई करा
मुंबई : राष्ट्रवादीतील ज्या नऊ आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मंत्रीपदाची शपथ घेतली आणि ज्या दोन खासदारांनी त्यांना साथ दिली त्यांच्यावर आता कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून विधिमंडळाचे अध्यक्ष आणि लोकसभेच्या सभापतींना देण्यात आलं आहे. पण, त्यांना दिलेल्या नोटिसीला अद्याप उत्तर दिलेलं नाही.

Exit mobile version