रब्बी हंगामात 1,403 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांचा भर
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यात भातकापणीनंतर जमिनीच्या अंगभूत ओलाव्याचा योग्य उपयोग करत रब्बी हंगामात कडधान्य लागवडीला चांगलाच वेग आला आहे. यंदा तालुक्यातील शेतकरीवर्गाने सुमारे 1,403 हेक्टर क्षेत्रावर विविध कडधान्य पिकांची लागवड केली असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशादायक वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यात मध्यम ते गाळाच्या काळ्या जमिनीचे प्रमाण मोठे असून, या जमिनीत कडधान्य पिकांची वाढ जोमाने होते. पाणीधारण क्षमता असलेली तसेच योग्य निचऱ्याची जमीन कडधान्य पिकांसाठी पोषक ठरते. भातकापणीनंतर बहुतांश शेतकरी विशेष मशागत न करता जमिनीच्या ओलाव्यावरच कडधान्य पिके घेतात. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढण्यास मदत होते. रब्बी हंगामात थंड व गार हवामान कडधान्य पिकांसाठी उपयुक्त मानले जाते.
सध्या पहाटेच्या सुमारास पडणारे दव, गारवा आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांची शाखीय वाढ चांगली होत आहे. यंदा पावसाचा कालावधी लांबल्याने कडधान्यांची लागवड डिसेंबरच्या सुरुवातीला करण्यात आली. पेरणीनंतर साधारणतः 60 ते 75 दिवसांत शेंगा पक्व होतात आणि दोन ते तीन टप्प्यांत काढणी केली जाते. यावर्षी तालुक्यात मटकी, चवळी, कुळीथ, मूग, कडवा वाल, तूर आणि हरभरा या प्रमुख कडधान्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. तयार होणाऱ्या ओल्या व सुक्या शेंगांची विक्री श्रीवर्धन तालुक्यासह तालुक्याबाहेरील बाजारपेठांमध्ये केली जाते. प्रथिने व पोषणमूल्यांचा उत्तम स्रोत असल्यामुळे डाळींना बाजारात कायमच चांगली मागणी आहे. दरम्यान, यंदा पावसाचा कालावधी वाढल्याने भातपिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले होते, मात्र रब्बी हंगामातील कडधान्य पिकामुळे शेतकऱ्यांचे भातपिकातून झालेले आर्थिक नुकसान काही अंशी भरून निघेल, असा विश्वास कृषी विभाग आणि शेतकरी व्यक्त करत आहेत.
श्रीवर्धन तालुक्यातील कडधान्य लागवड
(रब्बी 2025) :एकूण क्षेत्र : 1,403 हेक्टर
प्रमुख पिके : मटकी, चवळी, कुळीथ, मूग, कडवा वाल, तूर, हरभरा
पेरणी कालावधी : डिसेंबर
काढणी कालावधी : 60-75 दिवसांत,
2-3 टप्प्यांतविक्री : स्थानिक व तालुक्याबाहेरील बाजारपेठा
श्रीवर्धन तालुक्यात वाल व कडधान्यांची लागवड नियमितपणे होत असते. अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत नवीन वाणांना प्रोत्साहन देण्यासाठी हरभरा मिनीकिट, मूग व हरभरा गट प्रात्यक्षिके राबवली जात आहेत.
श्रद्धा डुंबरे, तालुका कृषी अधिकारी, श्रीवर्धन
