ओलाव्याअभावी कडधान्य लागवड अडचणीत

रब्बी हंगामातील लागवडीवर परिणाम होण्याची भीती
| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्ह्यामध्ये यंदा पाऊस समाधानकारक पडला असला, तरीदेखील तो लवकर गायब झाला. त्याचा परिणाम जमीनीतील ओलावा कमी झाल्याने रब्बी हंगामातील कडधान्य लागवड धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसामुळे रायगड जिल्हयातील भात उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला असताना, आता कडधान्य उत्पादक शेतकरीदेखील अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रायगड जिल्हयात भात शेतीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पावसाळ संपल्यावर कापणीनंतर वाल, मुग, चवळी, हरभरा यासारख्या कडधान्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. जिल्ह्यात साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रामध्ये कडधान्याची लागवड केली जाते. रब्बी हंगामात हरभरा, मुगाचेे क्षेत्र वाढावे. जिल्ह्यात वालाची लागवड अधिक केली जाते. कृषी विभागाने हरभरा लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील कडधान्य पीक पेरणीचे क्षेत्र 14 हजार 35 आहे. त्यात हरभरा 1076 हेक्टर व मुग दोन हजार 460 हेक्टर इतके आहे. कडधान्य क्षेत्रात लक्षणीय वाढ करण्यासाठी कृषी विभागाने शंभर टक्के अनुदानावर हरभरा व मुग कडधान्य देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यात हरभरा पीक एक हजार 275 हेक्टर व मुग पिक 965 हेक्टर क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिकांचे नियोजन केले आहे.त्यामध्ये हरभरा 892.5 क्विंटल व मूग 144.75 क्विंटल दिले जाणार आहे.

हरभरा, मुगाचे उत्पादन चांगले व्हावे यासाठी त्यासाठी पोषक मुलद्रव्येदेखील वितरीत केली जात आहेत. हरभऱ्याची लागवड करून त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. जिल्ह्यातून पाऊस लवकर गायब झाला. त्यामुळे जमीनीतील ओलावा वाढत्या तापमानामुळे कमी झाला आहे. जमीनीला भगदाड पडू लागल्याने कडधान्य लागवडीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता, गेल्या आठवड्यात अवेळी पाऊस झाला आहे. जमीनीत काही प्रमाणात ओलावा राहिला आहे. कडधान्य लागवडीसाठी ते पोषक आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर फारसा परिणाम होणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version