कर्जतमधील भातशेतीचे पंचनामे अद्याप अपुरेच

नुकसानग्रस्त शेतकरी वार्‍यावर
माहिती देण्यास अधिकार्‍यांची टाळाटाळ
वेणगाव | वार्ताहर |
जुलै महिन्यात काही दिवस पावसाने हाहाकार माजवला होता. यात तालुक्यातील असलेली भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले असल्याने येथील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसान झालेल्या भातशेतीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच काही संघटनांनी निवेदन देऊनसुद्धा या घटनेला 20 ते 25 दिवस होत आले तरी अद्याप कर्जत तालुक्यात कृषी विभाग कार्यालयातून शेतीचे पंचनामे अद्याप अपुरेच आहेत.
यासंबंधी माहिती घेण्यासाठी तालुका कृषी विभाग कार्यालय, कर्जत येथे तीन ते चार वेळा भेट दिली असता, संबंधित विभागाचे तालुका कृषी अधीकारी शीतल शेवाळे व मंडळ अधिकारी प्रवीण जाधव हे कधी मिटींगला गेलेत, तर कधी ट्रेनिंगला गेलेत, असे सांगण्यात आले आहे. येथे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळवले असून, बळीराजा संकटात सापडलेला असताना, या अधिकार्‍यांना शेतकर्‍यांचे काही पडलेले नाही, त्यांच्या मिटिंग व ट्रेनिंग महत्त्वाच्या वाटतात. यामुळे शेतकर्‍यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कर्जत तालुक्यातील दहिवली, वेणगाव, पराडे, तिवरे, वदप, कुशिवली, गौरकामत कोषाने, उंबरोली, सावरगाव, वांजळे, नेवली, तळवडे, कोल्हारे, धमोते, मालेगाव, दहिवली, बोर्डोले, शेलू, नांदगाव, पाषाने, कळंब, वारे, पोशिर, माणगाव, खांडस, आंबोट, पाली, पोटल, तांबस, दहिगाव, वरई, पोसरी, ओळमान आदी गावांतील शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे लवकरात लवकर करून शासन दरबारी पाठवून माहिती दिल्यास नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्याचा मोबदला मिळून त्यांची आर्थिक परिस्थिती सावरण्यास मदत होईल. पण, संबंधित कृषी अधिकारी मिटिंग आणि ट्रेनिंगच्या अंधाधुंदी कारभाराच्या वार्‍या करीत असल्याने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना डोक्यावर हात देऊन बसण्याची वेळ आली आहे.

शेतीची मोठी हानी
तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे येथील भातशेतीला फटका बसला आहे. भातशेतीत आजूबाजूच्या नदी, ओढ्या, नाल्यातून गाळ, दगड-माती वाहून आली आहे. यामुळे शेतीची खूप मोठी हानी झाली असून, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

Exit mobile version