| जयपूर | वृत्तसंस्था |
प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील 12 व्या हंगामातील 40 वा सामना पुणेरी पलटन आणि यू मुंबा या दोन संघांमध्ये पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली. परंतु, शेवटी अस्लम इनामदारचा पुणेरी पलटनचा संघ सुनिल कुमारच्या यू मुंबावर भारी पडला. हा सामना पुणेरी पलटनने 40-22 च्या फरकाने आपल्या नावावर केला. जयपूरच्या एसएमएस इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात पुणेरी पलटनचा संघ बचावात आणि चढाईतही आघाडीवर राहिला. पुणेरी पलटनकडून स्टूअर्ट सिंगने सर्वाधिक 8 गुणांची कमाई केली. तर, गुरदीपने 5 गुणांची कमाई केली. तसेच, यू मुंबाकडून अलिरेझाने 6 गुणांची कमाई केली.
या सामन्याच्या सुरूवातीला पुणेरी पलटनकडून अस्लम इमानदार पहिली चढाई करण्यासाठी आला. परंतु, यावेळी त्याला खाते उघडता आले नाही. बचावात मात्र पुणेरी पलटनने मजबूत पकड करत 1 गुण घेतला आणि संघाचे खाते उघडले. यू मुंबाला तिसऱ्या मिनिटापर्यंत खाते उघडता आले नव्हते. अलिरेजाने 1 गुण घेत यू मुंबाला खाते उघडून दिले. सुरुवातीचे 5 मिनिटे पूर्ण झाल्यानंतर पुणेरी पलटनचा संघ 4-2 ने आघाडीवर होता. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांमध्ये 13व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघ 6-6 ने बरोबरीत होते. त्यावेळी पुणेरी पलटनने सुपर टॅकल करत 2 गुणांची आघाडी घेतली. पुर्वार्धातील सुरुवातीच्या 20 मिनिटांचा खेळ झाल्यानंतर पुणेरी पलटनचा संघ 15-10 गुणांसह 5 गुणांनी आघाडीवर होता. उत्तरार्धातील पहिल्याच चढाईत पुणेरी पलटनने सुपर टॅकल करत दमदार सुरुवात केली. यू मुंबाने पुनरागमन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, पुणेरी पलटनला आपली आघाडी कायम ठेवण्यात यश आले. शेवटच्या 2 मिनिटांत पलटनकडे 11 गुणांची आघाडी होती. सामन्यातील शेवटच्या मिनिटाला यू मुंबांचा संघ पहिल्यांदाच सर्वबाद झाला. यासह पुणेरी पलटनने हा सामना 40-22 च्या फरकाने जिंकला.







