पुण्याच्या सतेजचा आफ्रिकेत डंका

। डर्बन । वृत्तसंस्था ।

साउथ आफ्रिका येथे झालेल्या 97व्या कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेत पुणे येथील मायक्रोसॉफ्ट कंपनीत आयटी व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या सतेज नाझरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी ही आव्हानात्मक स्पर्धा 10 तास 09 मिनिटे 24 सेकंदात पूर्ण केली. या स्पर्धेत एकूण चढाई 1757 मीटर आणि उतार 1104 मीटर होता. कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धा 1921 मध्ये सुरू झाली असून, यंदाचे वर्ष या मॅरेथॉनचे 97वे वर्ष होते.

9 जून रोजी झालेल्या या जगातील सर्वांत जुन्या आणि खडतर मॅरेथॉन स्पर्धेत डर्बन ते पीटरमेरिजबर्ग या शहरांमधून स्पर्धक धावत होते. ही स्पर्धा दरवर्षी एकदा अप आणि दुसर्‍या वर्षी डाऊन अशा स्वरूपात घेतली जाते. अल्ट्रा मॅरेथॉनच्या जगात अतिशय लोकप्रिय आणि आव्हानात्मक असलेल्या या स्पर्धेत 70 पेक्षा जास्त देशांतून स्पर्धक सहभागी होतात. सतेज नाझरे यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्या विचारांची प्रेरणा घेतली. स्पर्धा पूर्ण झाल्यावर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील फिनिक्स वसाहत येथील गांधीजींच्या घराला भेट देऊन गांधी आणि मंडेला यांना अभिवादन केले.

कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील अतिशय अवघड आणि जुनी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा असल्यामुळे जगभरातून यंदा 18,884 स्पर्धकांनी यात भाग घेतला होता, त्यापैकी 17,300 स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. सतेज नाझरे यांनी गेल्या 7-8 महिन्यांपासून या स्पर्धेची तयारी केली होती. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना 42.2 किमीचे मॅरेथॉन अंतर 4:49:59 तासांत पूर्ण करणे आवश्यक असते. सतेज यांनी टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमधून 50 किमी 05:05:51 मध्ये पार करून कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी पात्रता मिळवली. त्याचबरोबर, टाटा मुंबई मॅरेथॉन, कास अल्ट्रा मॅरेथॉन, सिंहगड आणि पानशेत रस्ता, तळजाई टेकडी, लोणावळा, हाडशी, सातारा टेकडी अशा मैदानी आणि डोंगराळ प्रदेशांत सराव केला. यासाठी त्यांना सतार्‍याचे शिव यादव यांच्या कडून धावण्याचे प्रशिक्षण आणि दिव्यानी निकम यांच्याकडून आहाराबाबत मार्गदर्शन मिळाले.

Exit mobile version