। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खवटी सतीचा कोंड येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. याबाबत ओरड झाल्यानंतर मंडळ अधिकारी यांनी केलेल्या पंचनाम्याप्रमाणे तहसीलदारांनी 1 कोटी 31 लाख 25 हजाराची दंडात्मक कारवाई केली आहे.
राष्ट्रीय महामार्गालगतच्या खवटी सतीचा कोंड येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती तक्रारदार कुसाळकर यांनी दिली होती. यावेळी मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील साठा पाहून 505 ब्रास मातीचे उत्खनन झाल्याचा अहवाल तहसीलदारांना दिला होता. तहसीलदारांनी शासकीय दराने स्वमित्वधन 600 रुपयाप्रमाणे 505 ब्रास व बाजारमूल्य 5 हजार रुपये प्रती ब्रासप्रमाणे पाचपट दंड म्हणून 1 कोटी 31 लाख 25 हजाराची दंडात्मक कारवाई केली आहे. येथे 100 ब्रासचे उत्खनन करण्याची परवानगी दिल्याचे दिसून येते. मात्र, परवानगीपेक्षा अधिक उत्खनन झाल्यामुळेच दंडात्मक कारवाई केल्याचे लेखी पत्र उत्खनन करणार्यांना देण्यात आले आहे.