राजवर्धन, विकीच्या गोलंदाजीची चमक; एक डाव, 92 धावांनी पंजाब पराभूत
| चंदिगड | वृत्तसंस्था |
रणजी चषक स्पर्धेत महाराष्ट्राने पाचव्या फेरीत पंजाबला एक डाव आणि 92 धावांनी पराभूत केले. महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी दोन्ही डावात चमक दाखवली. त्यात राजवर्धन हंगारगेकरने 5 आणि विकी ओत्सवालने 6 बळी घेतले. या विजयामुळे महाराष्ट्राला 7 गुण मिळाले आहेत. आत्तापर्यंत झालेल्या 5 सामन्यांपैकी महाराष्ट्राने 2 सामने जिंकले आहेत, तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. हा सामना न्यू चंदिगड येथे पार पडला.
या सामन्यात महाराष्ट्राचे गोलंदाज दोन्ही डावात चमकले. पंजाबला दिलेल्या फॉलोऑननंतरही त्यांना पुनरागमन करता आले नाही. पंजाबच्या पहिल्या डावात महाराष्ट्राकडून राजवर्धन हंगारगेकरने 5 बळी घेतले, तर पंजाबच्या दुसऱ्या डावात विकी ओत्सवालने 6 बळी घेतले. या सामन्यात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 113.3 षटकात सर्वबाद 350 धावा केल्या होत्या. महाराष्ट्राकडून अर्शिन कुलकर्णीने 133 धावा केल्या होत्या. तर, पृथ्वी शॉ याने 74 धावांची खेळी केली होती. त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले होते. याशिवाय रामकृष्ण घोषन 32 धावांची खेळी केली. तर, कर्णधार अंकित बावणे (23) आणि जलज सक्सेना (नाबाद 20) यांनीच 20 धावांचा टप्पा पार केला.पंजाबकडून या डावात गुरनूर ब्रारने सर्वाधिक 4 बळी घेतले. तसेच, आयुष गोयल, हरप्रीत ब्रार व मयंक मार्कंडेने प्रत्येकी 2 बळी घेतले.
त्यानंतर पंजाबने पहिल्या डावात 58.4 षटकात सर्वबाद 151 धावा केल्या. त्यामुळे 199 धावांची आघाडी घेत महाराष्ट्राने पंजाबला फॉलोऑन दिला होता. पंजाबच्या पहिल्या डावात अनमोल मल्होत्राने सर्वाधिक 35 धावा केल्या. त्याशिवाय सलील अरोराने 25 आणि हरनूर सिंगने 26 धावा केल्या. बाकी कोणालाही 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. महाराष्ट्राकडून या डावात हंगारगेकरने 17.4 षटकात 44 धावा देत 5 बळी घेतले. तसेच, रजनीश गुरबानीने 4 बळी आणि जलज सक्सेनाने 1 बळी घेतला. त्यानंतर पंजाबचा दुसरा डाव 40.5 षटकात 107 धावांवर संपला. या डावात सलील अरोराने नाबाद 22 धावा केल्या, तर अभिनव शर्माने 23 धावा केल्या. बाकी कोणाला खास काही करता आले नाही. महाराष्ट्राकडून विकी ओत्सवालने 6 बळी, तर रामकृष्ण घोषने 2 बळी घेतले. तसेच, अर्शिन कुलकर्णी आणि जलज सक्सेना यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
