दोन सामन्यांनंतर नऊ गुणांची कमाई; महाराष्ट्राचा दणदणीत विजय
| चंदिगड | वृत्तसंस्था|
पहिल्या दिवसापासून वर्चस्व गाजविणाऱ्या महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील इलिट ‘ब’ गटातील सामन्यात यजमान चंदिगडवर 144 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पृथ्वी शॉचे दमदार द्विशतक, ऋतुराज गायकवाडचे शतक, विकी ओस्तवाल, मुकेश चौधरी व रामकृष्ण घोष यांची अफलातून गोलंदाजी ही महाराष्ट्राच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. या विजयामुळे महाराष्ट्राचे 9 गुण झाले आहेत.
रणजी करंडक 2025-26 स्पर्धेत महाराष्ट्र संघ सध्या चांगल्या लयीत खेळत आहे. दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राने चंदिगढला 144 धावांनी पराभूत केले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला महत्त्वाचे 6 गुण मळािले असून दोन सामन्यांनंतर अंकित बावणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या महाराष्ट्र संघाचे 9 गुण झाले आहेत. महाराष्ट्राच्या चंदिगढविरुद्धच्या विजयात ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, रामकृष्ण घोष आणि मुकेश चौधरी यांचे विशेष योगदान राहिले आहे. या सामन्यात शेवटच्या डावात महाराष्ट्राने चंदिगढला 464 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना चंदिगढने चांगली लढत दिली होती. त्यातही अर्जुन आझादने दीडशतकी खेळी करत झुंज दिली; परंतु, चंदिगढचा संघ शेवटच्या दिवशी दुसऱ्या डावात 94.1 षटकात 319 धावांवर सर्व बाद झाला.
तत्पुर्वी, या सामन्यात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 85.5 षटकात सर्वबाद 313 धावा केल्या होत्या. महाराष्ट्राकडून ऋतुराज गायकवाडने 116 धावांची खेळी केली. तसेच, सौरभ नवलेने 66 आणि अर्शिन कुलकर्णीने 50 धावांची खेळी केली. चंदिगढकडून जगजीत सिंग संधू आणि अभिषेक सैनी यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. त्यानंतर चंदिगढला पहिल्या डावात सर्वबाद 209 धावाच करता आल्या. चंदिगढकडून रमण बिश्नोईने 54 धावांची आणि निशुंक बिर्लाने नाबाद 56 धावांची खेळी केली. महाराष्ट्राकडून विकी ओत्सवालने 6 बळी टिपले. त्यामुळे महाराष्ट्राला 104 धावांची आघाडी मळािली होती. महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने वादळी खेळी केली. त्याने 156 चेंडूत द्विशतकी खेळी केली. त्याने 29 चौकार आणि 5 षटकारांसह 222 धावांची खेळी केली. सिद्धेश वीरने 62 धावांची खेळी केली. तर, ऋतुराज गायकवाडने नाबाद 36 धावा केल्या आणि महाराष्ट्राने दुसरा डाव 359 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर 104 धावांच्या आघाडीसह महाराष्ट्राने 464 धावांचे लक्ष्य चंदिगढला दिले होते.







