पांढर्या कांद्याला ग्राहकांची पसंती
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागचा पांढरा कांदा रुचकर, चविष्ट व औषधी गुणधर्म असल्याने स्थानिकांसह पर्यटकांंच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे अलिबागच्या कांद्याला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा अधिक कांद्याच्या माळी विकल्या गेल्या आहेत. तब्बल सहा लाख रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. पांढर्या कांद्याला स्थानिक बाजारपेठांबरोबरच सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यासह पंजाब, दिल्ली राज्यातूनही मागणी येत असल्याची माहिती कांदा उत्पादक शेतकर्यांनी दिली.
अलिबागचा कांदा आकाराने मध्यम असून, चविष्ठ व औषधी आहे. त्यामुळे या कांद्याला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. पांढरा कांद्याला मागणी वाढू लागल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, बामणगाव व रामराज परिसरात कांद्याची लागवड केली जाते. सर्वात जास्त कार्ले परिसरात प्रत्येक घरातील शेतकरी पांढर्या कांद्याची लागवड करतो. तसेच रोहा तालुक्यातील खांब व देवकान्हे या गावांतील काही शेतकरीदेखील कांद्याची लागवड करतात. मात्र, अलिबागमधील कार्ले परिसरातील कांद्याला पसंती अधिक असते. जिल्ह्यात सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली जात आहे. कांदा लागवडीतून सुमारे दीड हजार शेतकर्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. कांद्यापासून सुमारे सहा टन एकरी, तर 15 टन हेक्टरी उत्पादन मिळते. सुमारे तीन कोटींची उलाढाल या कांद्यापासून होते.
भातकापणीची कामे संपल्यावर नोव्हेंबरला पांढरा कांदा लागवडीला सुरुवात होते. दोन ते अडीच महिन्यांत कांदा तयार होतो. त्यानंतर कांद्याच्या माळा तयार करून तो बाजारात येतो. यंदा कांदा वेळेवर तयार झाला असून, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात दाखल झाला. अलिबागमधील कांदा ग्राहक थेट शेतकर्यांकडून खरेदी करीत असल्याने शेतकर्यांना त्यातून फायदा होत आहे.
अलिबाग-पेण, अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरुड अशा अनेक मार्गांवर अलिबागचा कांदा विक्रीची दुकाने थाटली गेली आहेत. जिल्ह्यात फिरण्यास येणारे पर्यटक अलिबागचा कांदा विकत घेण्याकडे अधिक भर देत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत पाच हजार कांद्याच्या माळा विकण्यात आल्या आहेत. स्थानिक बाजारासह अन्य जिल्हा व राज्यातील बाजारातदेखील पांढर्या कांद्याला मागणी आहे. पंजाब, दिल्ली येथीलदेखील बाजारात अलिबागच्या कांद्याला मागणी वाढत आहे. कांदा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांना आर्थिक बळ मिळत आहे.
अलिबागमधील कांदा बियाणांना मागणी
अलिबागमधील चविष्ठ व मध्यम आकाराचा कांदा पोषक मानला जातो. औषधी गुणधर्म असलेल्या या कांद्याला मागणी वाढत असताना, कार्ले परिसरातील कांद्याच्या बियाणांनादेखील मागणी वाढत आहे. रत्नागिरी, सातारा येथून बियाणांची मागणी केली जात असल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे.
यंदा पांढर्या कांद्याची लागवड अनेक शेतकर्यांनी केली. कांदा बाजारात वेळेवर दाखल झाला. अलिबागमधील कार्ले, खंडाळा परिसरातील शेतकर्यांनी पिकविलेल्या कांद्याला मागणी वाढत आहे. तसेच बियाणांचीही मागणी होत आहे. – सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी