पावसापूर्वी लागणार्‍या वस्तूंची खरेदी

मिरची, सुकी मासळीची मागणी वाढली; अगोट खरेदीची तालुक्यात लगबग

। मंडणगड । प्रतिनिधी ।

तालुक्यात आगोटच्या कामाची लगबग सुरु झाली असून मसाले, सुकी मासळी, कांदे, बटाटे खरेदीसाठी तालुक्यातील आठवडा बाजारासह शहरात नागरिकांची लगबग वाढली आहे. पावसाळ्यातील तिखटासाठी महिलावर्ग लाल मिरची खरेदी व मसाले डंकावर गर्दी करत आहेत. मसाल्याचे पदार्थ, सुकी मासळी यांचा दर वाढलेला असताना या पदार्थांना प्रचंड मागणी आहे. सुट्टीसाठी चाकरमनी गावाकडे येऊ लागल्याने मुंबईकर देव्हारे, मंडणगड, कुंबळे, म्हाप्रळ येथील आठवडा बाजाराला आवर्जून भेट देत आहेत. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होताना दिसत आहे.

वाढलेल्या महागाईचा फटका सर्व घटकांना बसत असून सर्वच वस्तुंचे भाव वाढले आहेत. पावसापुर्वी सुकी मच्छी, तिखट, मीठ, कांदे, अगदी लाकूड फाटा चार महिन्यांकरीता साठवून ठेवण्याची मानसीकता आजही कायम आहे. पावसाळ्यातील गरम मसाल्याची बेगमी म्हणून गावठी आणि घाटी मिरची कुटून उत्कृष्ट, तिखट व रुचकर मसाले करण्याच्या तयारीला प्रामुख्याने वेग आला आहे. हल्ली बाजारात मसाल्यासह सर्व वस्तू आयत्या मिळत असल्या तरी अनेक घरांत आजही कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतीनुसार मसाला तयार करण्यात येतो. गणपतीपर्यंत अन्नधान्य, मसाल्याचे पदार्थ, सुकी मासळी व इंधनाची कमतरता भासू नये याकरिता पावसाच्या आधी प्रत्येक कुटुंब विशेष काळजी घेत असते.

महिलावर्गाची धावपळ
पावसाच्या कालावघीत इंधन व खाद्य पदार्थाची अडचण निर्माण होऊ नये याकरिता पुर्वापार चालत आलेल्या आगोटीसाठी शहर व परिसरातील गावातील महिलावर्गाची धावपळ मोठ्या प्रमाणात सुरु झालेली आहे. पावसाची चाहुल लागण्याआधी पंधरा ते वीस दिवस आगोटच्या तयारीस तालुक्यात सुरुवात होते. याकरिता सुकी लाकडे, मसाले व तिखट, सुकी मासळी यांची आपल्या गरजेनुसार साठवणूक केली जाते. शहरात तिखट व मसाले तयार करणार्‍या चक्यांमध्ये मिरची पावडर तयार करण्यासाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून महिला वर्ग विशेष गर्दी करताना दिसून येत आहेत. यंदा मिरची तसेच गोड व तिखट मसाल्यांचा भाव अधिक असल्याने तसेच अति उष्णतेमुळे पावसाचे संकेत मिळत असल्याने महिला वर्ग आगोटच्या तयारीला लागल्या आहेत.
Exit mobile version