बनावट सातबाराद्वारे शेत जमीन खरेदी

। नाशिक । वृत्तसंस्था ।
बनावट सातबारा उतार्‍याच्या आधारे शेतकरी असल्याचे भासवून सिन्नर तालुक्यात जमीन खरेदी करीत शेतकरी आणि शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संजय पुनूमियाविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बृहन्मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी पुनूमियाचे संबंध असल्याचे सांगितले जाते. खंडणीच्या गुन्ह्यातील सहआरोपी असणारा पुनूमिया सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे.

जमीन खरेदीतील फसवणुकीबाबत सिन्नरचे तालुका दुय्यम निबंधक यांनी तक्रार दिली. संशयित संजय पुनूमियाने शेतकरी असल्याचा ठाणे जिल्ह्यातील मौजे उत्तन येथील शेतीचा बनावट सातबारा तयार केला. त्याआधारे सिन्नर तालुक्यातील मौजे धारणगाव शिवारातील शेतजमीन खरेदी केली आहे. बनावट सातबाराच्या आधारे जमीन खरेदी करीत संशयिताने शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून सिन्नर पोलीस ठाण्यात पुनूमियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. या गुन्ह्याच्या तपासासाठी ठाणे पोलिसांकडून पुनूमियाचा ताबा घेण्यास न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. पुनूमिया ठाणे येथील एका गुन्ह्यात सध्या तुरुंगात आहे. संशयिताने समृद्धी महामार्गालगतच्या भागात जमीन खरेदी केली. या व्यवहाराचा वादग्रस्त पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्याशी संबंध असल्याची चर्चा होत आहे.

Exit mobile version