नेरळ येथे भाताची हमी भावाने खरेदी
| नेरळ | प्रतिनिधी |
मार्केटिंग फेडरेशनचे माध्यमातून भाताची हमी भावाने खरेदी करण्यात येते. त्यासाठी नेरळ येथील केंद्रावर बुधवारपासून भाताची हमी भावाने खरेदी केली. नेरळ, कळंब भागातील 400 शेतकर्यांनी आपल्या भाताची विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे.
कर्जत तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक पीक भाताचे घेतले जाते. यावर्षी सरत्या पावसामुळे भाताचे पीक शेतकर्यांच्या हातातून गेले आहे. पावसामुळे भाताच्या पिकावर आणि उत्पन्नावर मोठे परिणाम झाले आहेत. तरीदेखील शेतकर्यांनी भाताचे पीक गोळा करून साठवून ठेवले आहे. कर्जत तालुक्यात भाताची सर्वाधिक शेती केली जात असल्याने भाताचे पीक प्रत्येक शेतकर्यांच्या घरात जमा होते. त्यामुळे कर्जत तालुक्यातील नेरळ सर्वसाधारण गटातील शेतकर्यांसाठी आणि कशेळे आदिवासी भागासाठी जी भाताची खरेदी केंद्र सुरु होणे आवश्यक आहेत, तशी मागणी शेतकर्यांनी कर्जत तहसीलदार यांच्याकडे केली होती. त्यानुसार नेरळ येथे नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी यांना मार्केटिंग फेडरेशनकडून अधिकार देण्यात आल्यावर आज भाताची हमी भावाने खरेदी केंद्र सुरू झाले.
नेरळ खांडा येथील 1100 क्विंटल क्षमता असलेल्या गोदामात भाताचे हमी भाव केंद्र सुरू झाले. या केंद्राचे उद्घाटन नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र विरले यांचे हस्ते विक्रीसाठी आलेल्या भाताचे पूजन करून झाली. त्यानंतर ज्येष्ठ संचालक नारायण तरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भाताची खरेदी सुरू झाली. भाताची हमी भावाने विक्री करण्यासाठी आलेल्या पहिले शेतकरी कोल्हारे गावातील राहुल हजारे यांचे स्वागत संस्थेचे वतीने करण्यात आले. त्यावेळी उपसभापती रवींद्र झांजे, संचालक सावळाराम जाधव, शशिकांत मोहिते, नारायण तरे, यशवंत कराळे, विष्णू कालेकर, धोंडू आखाडे आदी उपस्थित होते. त्यावेळी शेतकरी मारुती विरले, राहुल हजारे, दत्ता सोनावले, दयानंद गवळी, सुशील कालेकर, भाऊ भोईर आदी उपस्थित होते.
नेरळ हमी भाव भात केंद्र
नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी यांना मार्केटिंग फेडरेशनकडून मान्यता देण्यात आली आहे.32 गावे असून त्याशिवाय तालुक्यातील अन्य गावातील शेतकरी हे देखील भात विक्री साठी आणू शकतात. नेरळ सोसायटी हद्दीतील आतापर्यंत 400 शेतकर्यांनी भाताची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मागील वर्षी भाताचे पीक चांगले होते आणि त्यावेळी तब्बल 13000क्विंटल भाताची खरेदी या केंद्रावर झाली होती. तुलनेत यावर्षी ऑनलाईन नोंदणीदेखील कमी झाली आहे. भात साठवून ठेवण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनकडून कापडी बारदाणे मिळतात, मात्र यावर्षी केवळ 3000 बारदाणे मंजूर झाली असून, पेण येथून ती आणावी लागणार आहेत. नेरळ येथील गोदाम पूर्ण भरल्यास कळंब येथील गोदाम उपलब्ध असल्याने तेथेदेखील नंतर खरेदी केंद्र सुरू करता येणार आहे.
भाताचे दर
सर्वसाधारण- प्रति क्विंटल 2300/-
उच्च दर्जा- प्रति क्विंटल 2320/-
यावर्षी शासनाने 2024-25 पीक पाणी नोंद झालेली नाही. त्यात अनेक शेतकरी आधार लिंक नसलेले मोबाईल घेऊन येत असतात. त्यामुळे ऑनलाईन करण्यात अडचणी येत आहेत.
– विष्णू कालेकर, संचालक







