। तळा । वार्ताहर ।
तळा शहरातील पुसाटी गावाला स्वदेस फाऊंडेशनच्यावतीने स्वप्नातील गाव प्रमाणित करण्याचा कार्यक्रम सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण करून करण्यात आली.
दरम्यान, स्वदेसच्या मार्गदर्शनामुळे गावातील लोकांनी स्वच्छतेवर भर दिला होता. आरोग्य, स्वच्छता व उपजीविका याविषयी अनेक उपक्रम स्वदेस फाउंडेशनच्यावतीने गावांमध्ये राबवण्यात आले आहेत. तसेच, शासनाच्या योजनेमधील वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबवण्यात आलेल्या आहेत. गावातील महिलांचे नेतृत्व, एकोपा या वैशिष्ट्यांमुळे स्वदेस व शासन यांच्या समन्वयाने पुसाटी हे स्वप्नातील गाव निर्माण झाले आहे. त्याच बरोबर प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठीदेखील समितीमार्फत प्रयत्न केले जात आहेत.
स्वप्नातील गाव व कामे करत असताना स्वदेस फाऊंडेशन तसेच शासनाच्या मोलाच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले, असे मत समिती सचिव वैभव वाघ, महिला मंडळ, मुंबईकर मंडळ यांनी व्यक्त केले आहे. यावेळी स्वदेस फाऊंडेशनचे मॅनेजर शिवतेज ढऊळ, तळा तालुका व्यवस्थापक राकेश मोरे, महेश पांचाळ व स्वदेस टीम तसेच पुसाटी ग्रामस्थ, महिला व मुंबईकर मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






