। पेण । प्रतिनिधी ।
गेली 15 दिवस भोगावती नदीमध्ये झालेल्या उत्खननाबाबत प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसिध्द करून प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला. परंतु गेंडयाच्या कातडीच्या प्रशासनाला काहीच फरक पडला नाही. अखेर निसर्गप्रेमी प्राध्यापक उदय मानकवळे यांना एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याची वेळ आली.
आठ दिवसापूर्वी याबाबत प्राध्यापक मानकवळे यांनी तहसिल कार्यालयात निवेदनाद्वारे भोगावती नदीमध्ये चाललेल्या अनधिकृत कामाबद्दल आपले म्हणणे मांडले होते. परंतु याबाबत तहसिल कार्यालयातून कोणतीच दखल घेतली नाही. त्यावेळी प्रा. उदय मानकवळे यांनी नदी वाचविण्यासाठी माफक मागण्या केल्या होत्या. भोगावती नदीचे सीमांकन करून पूररेषा निश्चित करा. महाराष्ट्रातील सर्व नद्यांचे सीमांकन करून उगमस्थान ते संगम स्थानापर्यत पूररेषा दर्शक माहिती फलक लावा. नद्यांवरील पूररेषेच्या आतील अतिक्रमण त्वरीत काढून टाका. गटाराचे पाणी, रासायनिक द्रव्य इतर मानवनिर्मित कचरा, प्लास्टिक नद्यांमध्ये टाकण्यास बंदी करा. महाराष्ट्रातील सर्व नद्यांना झेड सिक्युरिटी द्या. नदी काटावरील जैवविविधतेचे संरक्षण करा. तसेच भोगावती नदीमध्ये चाललेले अतिक्रमण तातडीने थांबवा, अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या. मात्र याकडे महसुल तसेच जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केले.