सर्वसाधारण सभेतच वाद उफाळला; नगराध्यक्षांकडूनच संबंधितांना घरचा आहेर
| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली नगरपालिकेच्या कामकाजात काही नगरसेविकांच्या पतींचा वाढता हस्तक्षेप आणि विकासकामांवरील श्रेयवाद अखेर सर्वसाधारण सभेतच उफाळून आला. प्रशासनाने नेमके निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे ऐकायचे की सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तथाकथित ‘नगरसेवक पतीं’चे, असा थेट सवाल उपस्थित करत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनीही “पालिका प्रशासनाने फक्त नगराध्यक्ष आणि अधिकृत नगरसेवकांचेच ऐकावे,” अशी स्पष्ट सूचना देत अप्रत्यक्षपणे संबंधितांना घरचा आहेर दिल्याची चर्चा रंगली आहे.
खोपोली शहरात विविध विकासकामे सुरू असताना काही प्रभागांमध्ये नगरसेविकांचे पतीच प्रत्यक्ष नगरसेवक असल्याप्रमाणे वावरत असल्याचे आरोप वाढू लागले आहेत. सोशल मीडियावरील प्रसिद्धी, उद्घाटने आणि प्रभागातील हस्तक्षेप यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राहुल गायकवाड यांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला. “कधी नगरसेविकांचे पती, तर कधी काही कार्यकर्ते स्वतःलाच नगरसेवक समजून वावरताना दिसत आहेत. प्रशासनाने जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींचे ऐकायचे की सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांचे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी पालिका अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना देत, “नगराध्यक्ष आणि प्रभागातून अधिकृतपणे निवडून आलेल्या नगरसेवकांच्याच सूचनांना प्राधान्य द्यावे,” असे सांगितले. दरम्यान, शहरातील घंटागाडी सेवा वेळेवर पोहोचत नसल्याबद्दल नगरसेवक सुनील पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील स्वच्छता व्यवस्थेबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
खोपोली पालिकेतील वाढता श्रेयवाद, नगरसेविकांच्या पतींचा कथित हस्तक्षेप आणि प्रशासनावरील दबाव यामुळे शहरातील राजकारण तापू लागल्याचे चित्र असून, पुढील काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.





