एक जागीच ठार, मायलेक अत्यवस्थ
| रसायनी | वार्ताहर |
दिवसभर वीटभट्टीवर अंगमेहनत करून झोपलेला संजय जाधव पहाटेच्या थंडीत टेम्पो अंगावर पडून जागीच झोपेत मरण पावला. तर, पत्नी व मुलगा मृत्यूशी झुंज देत. खालापूर तालुक्यात नडोदे हद्दीत पौद-कलोते मार्गावर वीटभट्टी असून, याच मार्गावरून एमएच. 04/जीआर/3116 या आयशर टेम्पो ऑईल भरलेले बॅरल घेऊन पहाटे डोंबिवलीकडे जात असताना रस्त्याच्या कडेला वीटभट्टी कामगार यांच्यासाठी तात्पुरता निवारा घेण्यासाठी बांधलेल्या झोपडीवर पलटी झाल्याने दिवसभर कष्ट करून झोपलेला संजय अनंत जाधव (35) याचा टेम्पो अंगावर पडून जागीच मृत्यू झाला, तर पत्नी दिपाली जाधव (30) व मुलगा संकेत (8) यांचे दोन्ही पाय झाले असल्याचे समजते. त्यांना कामोठे येथे एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे.
टेम्पो चालक सिंवा अशोक यादव, डोंबिवली याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टेम्पोत असलेले ऑईलचे बॅरल कोणत्या कंपनीतून टेम्पो चालक घेऊन कुठे जात होता, ते अद्यापही समजले नाही, तसेच हा मार्ग मोठ्या रहदारीचा नाही, या मार्गावरून पहाटे टेम्पो कुठे जात होता याचा तपास होणे गरजेचे आहे. खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि युवराज सूर्यवंशी व पोशि महेश खंडागळे पुढील तपास करीत आहेत.