शेकाप, माकप, भाकप देशव्यापी बंदसाठी एकवटले

बीड जिल्ह्यातील डाव्या पक्षांचे आवाहन
। केज । प्रतिनिधी ।
देशातील शेकडो शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने मंजुर केलेले शेतकरी विरोधी तीन काळे कायदे मागे घ्या या मागणीसाठी 27 सप्टेंबर रोजी होणार्‍या देशव्यापी संपात शेतकर्‍यांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे, असे आवाहन कॉ. पी एस घाडगे, कॉ. नामदेवराव चव्हाण यांनी केले आहे.

मागील नऊ महिन्यापासून दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने 27 सप्टेंबर रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. हा बंद बीड जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी डाव्या पक्षांच्या आघाडीची बैठक शनिवारी (ता.11) केज येथे शासकीय विश्रामगृहात भाकपचे जेष्ठ नेते कॉ. नामदेव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत भारत बंद यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष पक्ष व संघटनांना सोबत घेऊन केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या,वीज बिल विधेयक मागे घ्या, कामगार विरोधी कामगार कायदे रद्द करा, केंद्र सरकारने शेतकर्‍यांना 2020 चा पीक विमा लागू करावा, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तात्काळ मदत जाहीर करा, गॅस पेट्रोल डिझेल भाववाढ कमी करा या प्रश्‍नांसाठी शेतकर्‍यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीला कॉ. पी एस घाडगे, कॉ. नामदेव चव्हाण, मोहन गुंड, कॉ. दत्ता डाके, पांडूरंग राठोड, कॉ. अजय बुरांडे, कॉ. जोतिराम हुरकुडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कॉ. महादेव नागरगोजे, नारायण गोळे पाटील, बाबा सर, सय्यद याकूफ, भाऊराव प्रभाळ, राजकुमार कदम, मोहन लांब, अशोक थोरात, नवनाथ जाधव, अशोक रोडे, अनिल कदम, अमोल सावंत, भाई सुमंत उंबरे इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Exit mobile version