। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या मोग्रज गुप ग्रामपंचायतीची उपसरपंचपदाची निवडणुक नुकतीच पार पडली. शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य प्रकाश थोराड यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
कर्जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. निसर्ग संपन्नतेचा वारसा लाभलेल्या या तालुक्यात दुर्गम भाग देखील मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील मोग्रज गाव हे देखील दुर्गम भागात वसलेले आहे. येथील गाव, वाड्या-वस्त्यांची मिळून बनलेली ग्रुपग्रामपंचायत मोग्रजच्या उपसरपंच वर्षा रमेश मराडे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत पीठासीन अधिकारी सरपंच रेखा देशमुख यांच्याकडे प्रकाश थोराड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे माजी सभापती नारायण डामसे, पंचायत समिती सदस्या जयवंती दत्तात्रेय हिंदोळा, ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा रमेश देशमुख,मंगेश खेडेकर, गणेश मराडे, गणेश म्हसे, महेश म्हसे, बाळू कानडे, शिवाजी सांबरी आदी कार्यकर्त्यांनी उपसरपंच थोराड यांना शुभेच्छा दिल्या.