प्रा. एन.डी.पाटील…धगधगते नेतृत्व

(अतुल गुळवणी,अलिबाग 9270925201)

प्रा.एन.डी.पाटील या नावाला महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काय महत्व आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज भासणार नाही. गेल्या साठ, सत्तर वर्षाहून अधिक काळ एखाद्या धगधगत्या अग्निकुंडातील ज्वालेसारखे एनडी हे राज्याच्या राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात वावरत राहिले. त्या ज्वालेची ऊब समाजातील असंख्य घटकांना लाभली तर शेतकरी, कष्टकरी जनतेवर अन्याय करणार्‍या राज्यकर्ते, शेतकर्‍यांना उद्धवस्थ करणारे भांडवलदार यांना एनडी नावाच्या ज्वालेने भाजून काढले. त्यांच्या रुपाने एक कणखर नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाला लाभले. त्यामुळे शेकाप हा राज्याच्या राजकारणात नेहमीच ताठमानेने वावरत राहिला.सोमवारी कष्टकर्‍यांच्या या नेत्याने अखेरचा श्‍वास घेतला आणि सर्वसामान्यांचा आधारवढ कायमचा कोलमडून पडला.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत कमवा आणि शिकवा योजनेतून शिक्षण घेणार्‍या एनडींचे सारे आयुष्य हे खडतरच गेले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी रस्त्यावर उतरुणच संघर्ष केला. मग तो राज्यकर्त्याविषयीचा असो वा भांडवलदारांच्या विरोधातील असो. सर्वसामान्यांना लुटणार्‍या, शेतकरी, कष्टकरी जनतेवर अन्याय करणार्‍यांवर एनडीनी नेहमीच लोकशाहीच्या मार्गाने प्रहार करीत जेरीस आणले.मग त्यासाठी रस्त्यावर उतरुण आंदोलन करण्यातही त्यांनी कधीही कमीपणा बाळगला नाही. उलट रस्त्यावरचे आंदोलन हा तर त्यांचा मुळ स्थायी भावच होता.मग ते आंदोलन भाववाढी विरोधातील असो, खतदरवाढीचे असो वा रायगडातील सेझ विरोधातील असो.या सार्‍या आंदोलनात एनडी हे नेहमीच आघाडीवर राहिले.केवळ एका विभागापुरते नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जिथे जिथे सर्वसामान्य घटकांवर अन्याय होत असे तिथे तिथे एनडी नामक शक्ती या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ताठपणे उभी राहिल्याचे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले.

उच्चविद्याविभूषित असलेल्या एनडींकडे अमोघ असे वक्तृत्व होते. त्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक सभा गाजविल्या.विधीमंडळात एक अभ्यासू आमदार म्हणून काम करताना त्यांची भाषणे ही विधीमंडळात नेहमीच गाजत राहिली. राज्यकर्त्यांना सळो की पळो करुन सोडण्याची ताकद एनडी नामक एका अवलियाकडे होती. अर्थात कोणतेही भाषण करताना एनडींनी कधीही कुणावरही व्यक्तिगत टीका कधीच केली नाही. जे नियमात नाही त्यावर त्यांनी नेहमीच बोट ठेवत त्यावर शाब्दिक घाव घालण्यातही त्यांनी कधीच कमीपणा केला नाही.रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची गंगा खेडोपाड्यापर्यंत पोहोचविण्यातही एनडींचा मोठा हातभार राहिला.एनडींना राज्यसत्ता उपभोगण्याची संधी फार कमी मिळाली.

सन 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या पुलोद सरकारात एनडी हे सहकार मंत्री म्हणून कार्यरत होते.त्या सरकारचा कार्यकालही अल्पजिवीच ठरला. केंद्रातील तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने महाराष्ट्रातील शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार बरखास्त केले आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट जारी केली.सरकार बरखास्त झाल्याने मंत्रिमंडळही संपुष्टात आले.सहकार मंत्री म्हणून काम करताना एनडींनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.पण त्यांचा खरा पिंड हा विरोधकाचाच होता.अन्यायाविरुद्ध आवाज उठवून अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देणे हे एनडींचे ध्येय राहिले आणि त्यांनी ते अखेरच्या श्‍वासापर्यंत पाळले.त्यामुळे जिथे जिथे अन्याय होत राहिला तिथे तिथे त्या अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी एनडी नामक शक्ती ताठपणे उभी राहिली हे कुणीही नाकारु शकत नाहीत.

मार्गदर्शकाची भूमिका
शेकाप हा एनडींचा आत्माच होता.अखेरच्या क्षणापर्यंत ते पक्षाशी एकनिष्ठच राहिले. पक्षात अनेक चढउतार आले पण एनडी कधीही डगमगले नाहीत.उलट शेकापला उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी त्यांनी अहर्निशपणे काम केले.योग्यवेळी पक्षाची धुरा नव्या नेतृत्वाकडे सोपवून त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावली.

रायगडशी जुळलेली नाळ
रायगड हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय.त्यामुळे एनडी यांचे रायगडात सातत्याने येणेजाणे राहिले.ज् येष्ठ नेते अ‍ॅड.दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, दि.बा.पाटील या समकालिन नेत्यांसमवेत काम करताना ज्या ज्या वेळी रायगडात शेकापने आंदोलने केली त्या त्यावेळी एनडी हे धावून येत असत. त्यामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळत राही. मग ते आंदोलन सिडको विरोधातील असो वा आरसीएफ,अथवा राज्यकर्त्यांच्या विरोधात. या आंदोलनात दादा, भाऊ, दिबा यांच्या खांद्याला खांदा लावून एनडीही हिरीरीने सहभागी झालेले होते.अगदी पंधरा वर्षापूर्वी पेण, पनवेल तालुक्यात होऊ घातलेल्या महामुंबई सेझ प्रकल्पाच्या विरोधात शेकापने मोठे आंदोलन केले होते.त्या आंदोलनातही पेणचे तत्कालीन आमदार धैर्यशील पाटील यांच्या सोबत एनडीही सहभागी झालेले होते. अशा कितीतरी आंदोलनात एनडींचा सहभाग रायगडवासिय कदापि विसरु शकलेेले नाहीत.शेकापच्या तिसर्‍या, चौथ्या पिढीचेही एनडींसमवेत सूर जुळले.त्यामुळे ज्या ज्यावेळी एनडींचा दौरा रायगडात होत असे त्यावेळी त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे ऐकायला नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहात असे हे कुणीही नाकारु शकत नाही.

सामाजिक आंदोलनात एनडी आघाडीवर
श्‍चिम महाराष्ट्रातील अनेक सामाजिक प्रश्‍नांबाबत एनडी नेहमीच आक्रमक राहिले.शेतकर्‍यांचे वीज बिल माफ आंदोलन, ऊसाला दर मिळावा म्हणून आंदोलन,कोल्हापुरातील अनेक सामाजिक आंदोलनात एनडी हेच आघाडीवर रहात असतं. त्यामुळे राज्यकर्त्यांना या आंदोलनाची गंभीरपणे दखल घेणे भाग पडे.त्यातून काहीतरी चांगला निर्णय झाल्याशिवाय एनडी आपल्या भूमिकेपासून कदापिही दूर गेले नाही. आयुष्यभर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगी बाळगलेल्या एनडींवर महात्मा फुले.राजर्षि शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मोठा पगडा राहिला. कर्मवीरांच्या रयतचे संस्कार त्यांच्या मनावर कायमचे कोरले गेले. त्यामुळे बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी जे जे करणे शक्य आहे ते ते करण्यात एनडींनी धन्यता मानली.

Exit mobile version